पुणे : पुणे म्हटल्यावर डोळ्यासमोर उभं राहणाऱ्या मोजक्या उद्योगपतींपैकी एक नाव म्हणजे किर्लोस्कर. मात्र याच किर्लोस्कर उद्योग समूहाला कौटुंबिक कलहाची कीड लागली आहे. किर्लोस्कर घराण्यातील मालमत्तेचा वाद न्यायालयात पोहचला आहे.
उद्योग महर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांनी पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये 1957 मध्ये आलिशान बांगला बांधला. या ठिकाणी आधी असलेल्या तळ्याला 'लकाकी तळं' असं म्हटलं जायचं. त्यामुळे या बंगल्यालाही 'लकाकी बंगला' असं नाव देण्यात आलं. शहराच्या मध्यभागी काही एकरांमध्ये पसरलेला हा बंगला गेली कित्येक वर्ष पुणेकरांच्या आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय होता.
आता हाच आलिशान बंगला किर्लोस्कर कुटुंबीयांमधील वादाला कारण ठरला आहे. शंतनुराव किर्लोस्कर यांचे नातू आणि चंद्रकांत किर्लोस्कर यांचे पुत्र संजय याने यांनी बंगल्यातील दहा हजार स्क्वेअर फूट जागेवर दावा सांगितला. स्वतःची आई सुमन आणि भाऊ अतुल यांच्याविरोधातील खटला त्यांनी काही महिन्यांपूर्वी न्यायालयात जिंकला.
त्यानंतर संजय यांनी किर्लोस्कर कुटुंबीयांच्या एकूण मालमत्तेतील एक चतुर्थांश वाटा आपल्याला मिळावा म्हणून न्यायालयात दुसरा खटला दाखल केला.
संजय किर्लोस्करांनी कोणती मागणी केली?
* लकाकी बंगल्यातील सोळा हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट
* कार्पेट, ट्रान्झिस्टर, टीव्ही, फर्निचर, टेपरेकॉर्डर्स, शोभेच्या वस्तू अशा लहान-मोठ्या दहा वस्तू
* किर्लोस्कर कुटुंबीयांची संयुक्त मालकी असलेल्या कंपन्यांचे इक्विटी शेअर्स
* बँक खाती आणि राष्ट्रीय बचत योजनेमधील ठेवी
* दागिने, रोख रक्कम
* किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड या कंपनीतील 11 हजार 322 शेअर्स
शंतनुराव किर्लोस्कर यांचे पुत्र चंद्रकांत किर्लोस्कर यांनी निधनापूर्वी केलेल्या मृत्यूपत्रामध्ये या लकाकी बंगल्यातील 65 हजार स्क्वेअर फूट जागा त्यांची पत्नी सुमन यांच्या नावे केली. मात्र यूएलसी अॅक्टमधून ही जमिन वाचावी, यासाठी सुमन यांनी त्यापैकी प्रत्येकी दहा हजार स्क्वेअर फुटांचा भाग आपली दोन मुलं अतुल आणि संजय यांच्या नावे केला.
यूएलसी कायदा मागे घेण्यात आल्यानंतर सुमन यांनी दोन्ही मुलांकडे ती जागा परत मागितली. सुमन यांचा मोठा मुलगा अतुल यांनी त्यांच्याकडे असलेली दहा हजार स्क्वेअर फूट जागा आईला परत केली मात्र संजय यांनी त्यास नकार दिला आणि वादाला सुरुवात झाली.
लक्ष्मणराव किर्लोस्करांनी 1888 मध्ये एका छोट्या जागेत पंपांची निर्मिती सुरु करुन किर्लोस्कर उद्योग समूहाचं रोपटं लावलं. पुढच्या पिढीतील शंतनुराव किर्लोस्करांनी पुढे या रोपट्याचा वटवृक्ष केला. सत्तरहून अधिक देशांमध्ये किर्लोस्करांची उपकरणं आज निर्यात होतात.
किर्लोस्कर उद्योग समूहात रोजगार मिळाल्याने हजारोंचे संसार उभे राहिले. सांगली जिल्ह्यातील ओगलेवाडीजवळ 1910 मध्ये किर्लोस्करांनी उभारलेला औद्योगिक गृहप्रकल्प हा देशातील दुसऱ्या क्रमांकांची सर्वात जुनी इंडस्ट्रीयल टाऊनशीप म्हणून ओळखला जातो. मात्र आता या कुटुंबामध्ये मालमत्तेच्या कारणावरुन सुरु झालेला हा गृहकलह मराठी माणसाला विषण्ण करणारा आहे.
पुण्यातील किर्लोस्कर घराण्याला मालमत्तेच्या वादाची कीड
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
18 Apr 2018 08:11 PM (IST)
संजय किर्लोस्कर यांनी कुटुंबीयांच्या एकूण मालमत्तेतील एक चतुर्थांश वाटा आपल्याला मिळावा म्हणून न्यायालयात दुसरा खटला दाखल केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -