पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या तीन संशयित तरुणांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर या तीन तरुणांचे फोटो व्हायरल झाले होते याचाच आधार घेत रुग्णालयातील काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने या तरुणांना कोंडून ठेवले आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. हे नेमके तरुण कोण आहेत? कुठून आले होते? काय आहे हा संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.
पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात तीन संशयीत तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि घटनास्थळी धाव घेत त्यांनी या तिन्ही जणांना ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर बांगलादेशी तरुण रुग्णालयात येणार असल्याची माहिती व्हायरल झाली होती. या संशयीतांचे फोटो सुद्धा व्हायरल करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने या तरुणांना पाहिले आणि त्याने या तिघांना एका रूममध्ये कोंडून पोलिसांना माहिती दिली.
रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढले
पोलीस येण्यापर्यंत रुग्णालयात काहीसा गोंधळ निर्माण झाल्यामुळे काही रुग्णांना देखील रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलं होतं. पोलिसांनी तात्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी काल 3 संशयीत लोकांचे फोटो रुग्णालय प्रशासनाला पाठवले होते. आज सकाळी ते तिघे इथे तपासणीसाठी आले होते. त्यांचे नाव आमच्या रजिस्टरमध्ये आहेत. काल देखील ते तिघे या हॉस्पिटलमध्ये रक्ताची चाचणी करण्यासाठी आले होते अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलीय.
कागदपत्रांची पडताळणी सुरु
या तिन्ही संशयतांच्या घरी पुणे पोलिसांनी आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने देखील जाडाझडती घेतली. काल संध्याकाळी सोशल मीडियावर काही फोटो आणि मेसेज अपलोड करण्यात आले होते. हे तिघे आज कमला नेहरु रुग्णालयात आले होते. आतापर्यंत तिघांकडे तपास केला असता त्यांच्याकडे एका राज्याचे रहिवासी असल्याचे पुरावे त्यांनी दिलेत. त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
हे ही वाचा :
'दृष्टी'ची झाली आयेशा... ट्यूशनमधून ओळख वाढवली, ब्रेन वॉश केलं, उल्हासनगरमधील हिंदू तरुणीचं धर्मांतरण; दोघांना अटक