पुणे : वन्यजीव प्राण्यांनी आपला मोर्चा शहरांकडे वळवल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या काही महिन्यांत, वर्षात बिबट्या (Leopard) आणि वाघ यांसारख्या हिंस्र प्राण्यांचाही नागरी वस्तीत वावर झाल्याचं दिसून आलं आहे. अनेकदा या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न देखील केले आहेत. मात्र, अद्यापही शहरात किंवा नागरी वस्तीत बिबट्याचा वावर होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण, काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुले आणि प्रौंढानाही आपला जीव गमवावा लागला आहे. आता, पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नरमध्ये चक्क एकामोगोमाग एक असे तीन बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याचं एका सीसीटीव्हीत कैद झालं आहे.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याच दर्शन होणं काही नवीन नाही. कारण, जुन्नर तालुक्यातील अनेक भागात बिबट्या सर्रास दिसतो, नागरिकांना त्याचे दर्शन होतच असते. मात्र, जुन्नर तालुक्यातील रोहोकडी गावातील एक असा काहीसा व्हिडिओ समोर आलाय की तो पाहून अंगाचा थरकाप उडेल. रोहोकडी येथील विजय जनार्दन मुरादे या शेतकऱ्याच्या घराजवळ एक दोन नाही तर तब्बल तीन-तीन बिबटे फिरताना दिसले आहेत. बिबट्याचा हा मुक्त वावर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जुन्नर तालुक्यातील मानवी वस्ती असलेल्या परिसरात बिबट्या आल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अनेकदा तर बिबट्याने नागरिकांवर हल्ले देखील केले आहेत. मात्र, तीन-तीन बिबटे एकत्र फिरत असल्याचे पहिल्यांदाच निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये मात्र वन्यप्राण्याची दहशतच पसरली आहे.
एका मागोमाग एक तिघांचा वावर
सीसीटीव्हीतील हा व्हिडिओ समोर आलयानंतर वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. समोर आलेल्या व्हिडिओत, यावेळी तीन बिबटे एकत्र मुक्त वावर करताना दिसत आहेत. सुरुवातीला एक बिबट समोर येतोय आणि त्यानंतर त्याच्यामागून आणखी दोन बिबटे येताना दिसत आहेत. हे तीनही बिबटे एकत्र पुढे जाताना दिसतात, त्यांचे डोळेही रात्रीच्या अंधारात चमकत आहेत. रोहोकडी येथील माळवाडी-नखलवाडी रोडवरील बोल्हाई माता मंदिराजवळ असलेल्या विजय जनार्दन मुरादे यांच्या घराजवळचं हे दृश्य आहे. प्राथमिक माहितीनुसार हे तीनही बिबटे भक्षाच्या शोधात एकत्र फिरत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तीन-तीन बिबटे अशा पकारे एकत्र फिरत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.