Pune Independance Day: पावसामुळे (Pune) लोहगाव-वाघोली (Lohagaon-Wagholi) रस्ता अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला आहे. नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पुणे महापालिकेने(Pune Municipal Corporation) या समस्येकडे लक्ष न दिल्यास 15 ऑगस्ट रोजी आम्ही साचलेल्या पाण्यात राष्ट्रध्वजाला वंदन करु, असा इशारा लोहेगाव-वाघोली नागरिक विकास मंचाने दिला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पाण्यात साजरा करु का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.



पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पाण्याची लाईन नसल्याने लोहेगाव परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आणखी अडवल्याने रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे वाहने पाण्यात अडकून वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेचा रस्ते विभाग आणि मलनिस्सारण ​​विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने आठवडाभरापासून पाणी साचत आहे, असाही आरोप त्यांनी पालिकेवर केला आहे. महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही समस्या आमदार सुनील टिंगरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ महापालिका आयुक्तांशी बोलून तातडीने पाण्याचा निचरा करण्याची विनंती केली आहे.


ड्रेनेज लाइनवरून जाणाऱ्या ठिकाणी गाळ साचल्याने पाणी साचले आहे. पाण्याला जाण्यासाठी मार्ग मिळत नसल्याने माणसाच्या कमरेपर्यंत पाणी साचले आहे. या परिसरात वाहनं अडकून पडली असून रुग्णवाहिका पाण्यात अडकत आहेत. त्यामुळे नागरीकांना त्रास होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होत असून स्कूल बसेस शाळांमध्ये उशिरा पोहोचत आहेत. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर मलनिस्सारण ​​विभाग पाण्याचा निचरा करणे आमचे काम नसल्याचे सांगत आहे. रस्ते विभागाशी संपर्क साधला असता सांडपाणी विभागामुळे वाहतूक कोंडी होत आहे असं सागितलं. त्यामुळे रुग्णवाहिका पाण्यात अडकत असल्याचे सांगण्यात आलं. टेम्पो, दुचाकी घसरल्याने अपघात होत आहेत. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार वाढले आहेत. या गंभीर समस्येकडे महापालिकेने लक्ष न दिल्यास देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साचलेल्या पाण्यात साजरा करू, असा इशारा लोहेगाव-वाघोली रस्ते विकास मंचाने महापालिकेला दिला आहे.