पुणे: पुण्यातील हिंजवडीत काल (बुधवारी, ता 20) सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला भीषण आग लागून कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बसच्या चालकानेच सहकारी कामगारांच्या त्रासाला कंटाळून आग लावल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. आग लावून बेशुद्ध झाल्याचं नाटक चालकाने केलं होतं, परंतु पोलिसांनी दवाखान्यात जाऊन चौकशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालकानेच आपल्या कृत्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे आणि चालकाने केलेल्या कृत्याने संताप व्यक्त केला जात आहे. बसमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं चालकाला भासवायचं होतं. परंतु शॉर्ट सर्किटने लागलेली आग अगदी काही क्षणार्धात भडका उडाला. या गोष्टीचा संशय पोलिसांना आल्यामुळे त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली त्यानंतर हे सर्व संतापजनक सत्य समोर आलं आहे.


सुरूवातीला चालक बेशुद्ध असल्याचं भासवत होता असाही संशय पोलिसांना आहे. घटना घडल्यानंतर सुरूवातील चालक जनार्धन हबर्डीकर बोलू शकत नाही, असं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं होतं. त्यांनी सकाळपर्यंत चालकाची वाट पाहिली. बस चालक जनार्दन हबर्डीकर बोलू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर तत्काळ पोलिसांना हिंजवडी पोलिसांनी गुरुवारी सकाळी त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने काही सांगितले नाही. नंतर मात्र मनातील राग आणि संतापाच्या भरात त्याने केलेल्या कृत्याची माहिती सांगितली. मी चालक असूनही मला मजुराची वागणूक देण्यात येत होती. माझा दिवाळीचा बोनस कापण्यात आला होता. दुपारी जेवायला देत नव्हते. परवा दुपारी मला जेवणाचा डबा खायलाही वेळ दिला नाही. तसेच बसमधील तीन जणांशी माझे वाद होते. त्यामुळे मी हे केलं, अशी कबुली जनार्दन हबर्डीकर याने पोलिसांजवळ दिली आहे.


पोलिसांनी आधिक चौकशी केली असता, मला एवढं मोठं कांड करायचं नव्हतं. किंबहुना एवढा मोठा प्रकार होईल, असा मला वाटलंही नव्हतं. परंतु बसला आग जास्तच लागली. ज्यांची काही चूक नाही त्या चार जणांचे यामध्ये जीव गेले, याचे दु:खही चालक जनार्दनने पोलिसांजवळ व्यक्त केल्याची माहिती आहे. त्याबद्दल मला मनस्ताप होत असल्याचंही त्याने म्हटलं आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीकडून दिवाळी बोनस न दिल्याने आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मिळालेली वागणूक याचा राग मनात ठेवून वाहन चालक जनार्दन हंबर्डीकर याने बेंजामिन केमिकल आणि काही कापडी तुकड्यांचा वापर करून, काडी पेटीच्या सहाय्याने बसला आग लावून स्वतःचे जीव वाचवण्यासाठी बसच्या बाहेर उडी मारली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. 


टेम्पो ट्रॅव्हल्सच्या चालकाचा पगार थकवला नाही, मालकाचा खुलासा


पुण्याच्या हिंजवडीतील व्युमा ग्राफिक्स कंपनीने पगार थकवला, म्हणून टेम्पो ट्रॅव्हल पेटवली अशी कबुली चालक जनार्दन हंबर्डीकरने दिली. मात्र आम्ही त्याचा एक रुपयांचा ही पगार थकवला नाही, असा खुलासा मालक नितेन शाहने केला आहे. परंतु कंपनीतून एक लिटर की पाच लिटर चोरीला गेलं, याबाबत मला कल्पना नाही, असं म्हणत मालकाने काढता पाय घेतला. पोलीस कंपनीत येऊन तपास करतायेत, आम्ही त्यांना सहकार्य करतोय. असं शाह म्हणाले.


व्युमो ग्राफिक्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये होरपळून सुभाष भोसलेंचा मृत्यू झाला. आता त्यांच्या भावाने चालक जनार्दन हंबर्डीकरसह व्युमा ग्राफिक्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सामान्यांना न भेटणारे घातक बेंझिन केमिकल कंपनीतून चोरीला कसं काय गेलं? यात कंपनीचा निष्काळजीपणा झाला आहे, त्यामुळं कंपनीची चौकशी व्हायला हवी अशी मागणी विनोद भोसलेंनी केली आहे.