Pune Gram Panchayat Election Result 2022: पुणे जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी कोणीही अर्ज भरला नसल्यानं पाच पदं रिक्त राहिली आहेत. जिल्ह्यातील 221 (Pune Gram Panchayat Election Result 2022) ग्रामपंचायतींपैकी 45 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 176 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार विरुद्ध पालकमंत्री चंद्रकांत पाटील अशी लढत बघायला मिळाली आहे. यात अजित पवारांनी बाजी मारली आहे. 



सरपंच पद रिक्त राहिलेली गावे
भोर तालुक्यातील 2 गावे, दौंडमधील 1, जुन्नरमधील 1 गाव आणि मुळशीमधील 1 गावाचा समावेश आहे.


सदस्यपद रिक्त असलेली गावे
वेल्हा तालुक्यात 18 सदस्य, भोरमधील 22, दौंडमधील 1, जुन्नरमधील 16, आंबेगावमधील 8, खेडमधील 2, मावळमधील 1 आणि मुळशीमधील 11 ग्रामपंचायत सदस्य पदे रिक्त आहेत.


राष्ट्रवादीनं मारली बाजी


राष्ट्रवादी काँग्रेसने 92 जागांवर बाजी मारली आहे. भाजपने 38 जागांवर विजय मिळवला आहे. कॉंग्रेसने 21 जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाला मात्र 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवसेनेने 12 जागा काबीज केल्या आहेत आणि स्थानिक आघाडीने 52 जागांवर विजय मिळवला आहे.


अजित पवारांची जादू चालली
पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोन दादांमध्ये लढत होती. यात अजित पवारांनी 221 पैकी 92 ग्रामपंचायती ताब्यात घेत गड राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, सुनील शेळके, अतुल बेनके यांच्या तालुक्यांचा ही मोठा वाटा राहिलेला आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी स्वतः प्रचार केला असताना ही भाजपला अवघ्या 38 ठिकाणी विजय मिळवता आला आहे. त्यामुळे हा भाजपला धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडाचं शस्त्र उगरल्यानंतर ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 12 ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत, शिंदे गटाला मात्र तीन ग्रामपंचायतीत विजय मिळवून समाधान मानावे लागलेलं आहे. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी भोर आणि वेल्हा तालुक्यात अपेक्षेनुसार गड राखलेला आहे.


हवेलीत राष्ट्रवादीचं वर्चस्व
हवेली तालुक्यातील गोगलवाडीच्या सरपंच पदी अश्विनी गोगावले विराजमान होणार आहे. अश्विनी गोगावले या अशोक गोगावले  यांच्या पत्नी असून त्या काळूबाई माता ग्रामविकास पॅनलचे उमेदवार आहेत. हवेली तालुक्यात 3 ठिकाणी राष्ट्रवादी तर भाजपला 3 ठिकाणी विजय तर 3 जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्या आहेत.