Pune Gram Panchayat Election Result 2022:  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात (pune gram panchayatelection results 2022) राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे. आंबेगाव तालुक्यात राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी गड राखला आहे. 13 ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला आहे. तर ठाकरे गटाला एक आणि शिंदे गटाला एका ठिकाणी सत्ता मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे. या निकालामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का बसल्याचं मानलं जात आहे. 


आंबेगाव तालुक्यातील पक्ष निहाय निकाल 


आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली आहे. तालुक्यात 13 गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच विराजमान होणार आहे. त्यात   घोडेगाव , आंबेदरा, आमोंडी, गंगापूर खुर्द, चांडोली , कळंब , पारगांव तर्फे खेड  ,मेंगडेवाडी ,धामणी , भावडी , नारोडी, गोहे खुर्द , निघोटवाडी, रांजणी या गावांचा समावेश आहे. या विजयामुळे सगळ्या गावातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण बघायला मिळत आहे. यासोबतच शिवसेना आणि शिंदे गटाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्या देखील राष्ट्रवादीच्या हाती आहेत. नागापुर, डिंभे खुर्द,आहुपे,तळेघर, चिखली या गावाचा समावेश आहे. या निकालामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना चांगलाच धक्का बसला आहे. 


आंबेगाव तालुक्यात  माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांच्यात चुरस सुरु होती. दोघांनीही आंबेगाव तालुक्यात गड राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र दिलीप वळसे पाटील यांनी गड राखला आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांना चांगलाच धक्का बसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं होत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून शिवाजीराव आढळराव पाटील चांगलेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत होतं. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीदेखील त्यांनी चांगली तयारी केली होती. मात्र त्यांना एका जागेवरच समाधान मानावं लागलं. 


पुणे जिल्ह्यातील इतर निकाल 


-बारामती तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये सोरटेवाडी, कऱ्हाटी आणि पळशी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला आहे.


-पुणे जिल्ह्यात भाजपने खातं उघडलं. मावळ तालुक्यात सरपंचपदी भाजप उमेदवार विजयी झाला आहे.


-हवेली तालुक्यात एकूण 7 ग्रामपंचायती आहेत. आहेरीगाव, आव्हाळवाडी, कदमवाक वस्ती, बुर्केगाव, पिंपरी सांडस, पेरणी, गोगलवाडी या ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 194 उमेदवार रिंगणात आहेत. 



पुणे जिल्हा सरपंच (बिनविरोध धरून)


राष्ट्रवादी काँग्रेस - 49
भाजप - 16
काँग्रेस - 9
शिवसेना (शिंदे गट) - 1
शिवसेना (ठाकरे गट) - 5
स्थानिक आघाडी - 40


एकूण 221 - 120