पुणे : पुणे आणि बाॅम्बस्फोट म्हटलं की अनेक पुणेकरांच्या (German Bakery) मनात धडकी भरते. साधारण चाळीशीतील पुणेकरांच्या डोळ्यासमोर तो काळा दिवस येत असेल. 13 फेब्रुवारी 2010 हा दिवस पुणेकरांसाठी काळा दिवस होता. या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध जर्मन बेकरीत साधासुधा स्फोट नाही दहशतवाद्यांनी घडवलेला शक्तीशाली बाॅम्बस्फोट झाला होता. पुण्यातील इतिहास चाळला तर हा दिवस अनेकांच्या मनात धडकी भरवेल. 


दिवस होता 13 फेब्रुवारी 2010. साधारण सात वाजते होते. नेहमी प्रमाणे हौशी आणि खवय्ये असलेले पुणेकर  पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील नामवंत  अशा जर्मन बेकरीत बसले होते. ही बेकरी कॉलेज मधील तरुण, तरुणींचे ग्रुप, विदेशी पर्यटकांनी गजबजलेली होती. मात्र तेवढ्यातच या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. जर्मन बेकरीत अचानक मोठा स्फोट झाला आणि पुण्यात सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस, माध्यमं सगळे गोळा व्हायला सुरुवात झाली. आपापल्या परीने सगळे जीतोड प्रयत्न करत होते. या  रक्तरंजीत दिवसाला आज 14 वर्ष पूर्ण झाले. मात्र 14 वर्षानंतरही पुणेकर हा हल्ला विसरु शकले नाहीत.


दोन मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं...


जर्मन बेकरीत अचानक मोठा स्फोट झाला आणि लोक सैरावैरा धावत सुटले होते. हसत खेळत असणाऱ्या लोकांची जोरात आरडाओरड सुरु झाली. या बेकरीत माणसांचे मृतदेह सगळीकडे विखुरले होते. सगळीकडे रक्त आणि शरीरभर जखमा होत्या. लोक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तरफडत होते. साधा चहा, नाश्ता आणि गप्पा करायला आलेल्या पुणेकरांना रक्ताचा सडा बघावा लागला. सुरुवातीला साध्या सिलेंडरचा स्फोट झाला असं अनेकांना वाटलं मात्र हा साधासुधा स्फोट नसून तो दहशतवाद्यांनी घडवलेला शक्तीशाली स्फोट होता. अनेकांचे तुटलेले हातपाय, विखुरलेलं शरीर पाहून पोलिसांनाही धडकी भरत होती. हे सगळं पाहून स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते स्वत:हून पूढे येत जमेल तशी मदत करत होते आणि बचावकार्य राबवत होते. या बॉम्बस्फोटात 17 निष्पाप जीवांचा बळी गेला होता. त्यात पाच विदेशी नागरिकांचा समावेश होता. त्यातले दोघे पुण्यातले होते. 56 नागरिक या स्फोटात जखमी झाले होते. या जखमींमध्ये 10 विदेशी होते. या जखमींना पुण्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यादिवशी या परिसरात आणीबाणीची परिस्थिती होती. पुण्यातल्या जर्मन बेकरीचं नाव एकाच क्षणात वेगळ्याचं कारणाने जगभरात पोहचलं होतं. जर्मन बेकरीवर झालेला हल्ला हा केवळ एका कॅफेवर झालेला हल्ला नव्हता तर देशावर झालेला हल्ला होता. हा काळा दिवस पुणेकरांच्या मनातून कधी जाणार नाही. त्यासोबत जर्मन बेकरीचे मालक  ज्ञानेश्वर नारायण खरोसे आणिस त्यांच्या कुटुंबियांच्या मनावर या स्फोटामुळे मोठे आघात झाले तेदेखील पुसले जाणार नाही.


यासगळ्या घटनेनंतर ही बेकरी पुन्हा सुरु करण्याचं आव्हान खरोसे कुटुंबियांवर होतं. त्यानंतर कुटुंबियांनी सगळं विसरुन पुन्हा एकदा नवी सुरुवात केली. आता या बेकरीत आलेले ग्राहक हीच ती बॉम्बस्फोट झालेली बेकरी आहे का ? असं विचारतात. त्यावेळी खरोसे कुटुंब धीरानं त्यांना होय हीच ती बेकरी असं उत्तर देतात. 


मराठी माणसाने  सुरु केली जर्मन बेकरी 


1989 मध्ये पुण्यातील ज्ञानेश्वर नारायण खरोसे या मराठी माणसाने ही बेकरी सुरु केली होती. ज्ञानेश्वर नारायण खरोसे यांचा परकीय चलनाचा व्यावसाय होता. त्यामुळे त्यांचा अनेक विदेशी लोकांशी संबंध यायचा त्या लोकांसाठी खास जर्मनीतला वुडी नावाचा कूक बोलवून ज्ञानेश्वर यांनी ही बेकरी सुरु केली होती. त्याकाळात पुण्यातील फार कमी हॉटेल्समध्ये विदेशी पदार्थ मिळायचे. हे लक्षात घेत त्यांनी ही बेकरी सुरु केली होती. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Metro : हौस- मौज झाली अन् पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली; ट्रॅफिक जैसे थे!