पिंपरी-चिंचवड, पुणे : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण (Pune fire) आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहानग्यांचा समावेश आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र संपूर्ण शाहनिशा केल्यानंतर ही आग श़ॉर्ट सर्किटमुळे लागली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र या चौघांच्या मृत्यूला जबाबदार कोण?, असा प्रश्न सध्या निर्माण केला जात आहे.
या आगीबाबत माहिती मिळताच पहाटे 6 च्या सुमारास इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यात महावितरणकडून दुकानात लावलेल्या मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत असल्याचे तसेच वीजमीटर व सर्व्हिस वायर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. सोबतच महावितरणच्या यंत्रणेमधून कोणत्याही प्रकारचे शॉर्ट सर्किट झाले नसल्याचे या प्राथमिक पाहणीत आढळून आलं आहे.
पहाटेच्या सुमारास चिखलीमधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती. याच हार्डवेअरमध्ये कुटुंब वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही आग इतकी भीषण होती की, आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घरी कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. चिखली येथील हार्डवेअर दुकानाला पहाटे पाचच्या सुमारास लागली होती. याच दुकानाच्या माळावर चौधरी कुटुंबीय राहत होतं. दुकानात ऑईल पेंट असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं. याच पेंटच्या आगीने दुकानात वायू निर्माण झाला. आग आणि वायू यात गुदमरुन पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. चिमणाराम बेणाराम चौधरी ( पुरुष) वय 48, नम्रता चिमणाराम चौधरी (महिला) वय 40, भावेश चिमणाराम चौधरी (पुरुष मुलगा) वय 15, सचिन चिमणाराम चौधरी(पुरुष मुलगा) वय 13 अशी या घटनेत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावं आहे.
पुण्यात आगीच्या घटनेत वाढ
पुण्यात आगीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अनधिकृत बांधकाम आणि शॉर्ट सर्किटमुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडतात. पुण्यात काही दिवसापूर्वी टिंबर मार्केट आणि मार्केटयार्डमधील गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली या आगीत मोठं नुकसान झाले. पाच मोठी गोडाऊन डोळ्यादेखत खाक झाली. सुमार पाच तास आग आटोक्यात येत नव्हती. अनेकांच्या घरात नुसता धूर दिसत होता. मागील अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या 8 कुटुंब रस्त्यावर आली होती.