Pune Drugs News : पुणे अंतराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. पुणे गुन्हे शाखेनं (Pune Police News) आतापर्यंत 4000 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा ड्रग्जसाठा जप्त (Pune Drugs) केलाय. या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याच्या दृष्टीनं पुणे गुन्हे शाखेनं याप्रकरणात आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तपासामध्ये त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर येत आहेत. आरोपींच्या मोबाईल डेटा तपासल्यानंतर पोलिसांना गुन्हेगारांची टोपणनावं समजली आहेत. या नावाचा वापर करत पेडलर ड्रग्जची तस्करी करतात.
लंबा बाल, मुंबई का बंदर -
मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी टोळीने तयार केली टोपण नावे पोलिसांना मिळाली आहेत. ड्रग्ज रॅकेटमध्ये "लंबा बाल" आणि "मुंबई का बंदर" या टोपण नावांचा वापर करण्यात आला. सराईत वैभव माने याला केसांची शेंडी होती. त्यामुळे त्याला "लंबा बाल" म्हणून ओळखले जात होते. मुंबईत राहणारा युवराज भुजबळ याला "मुंबई का बंदर" म्हणून बोलावले जात होते. आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात पोलिसांना यश आलेय. राज्यासह देशभरात मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचे कोडिंग वापरलेय.
ड्रग्स बनवायच्या फॅार्म्युलाचे कोड वर्ड -
पुण्यातील ड्रग्स रॅकेट प्रकरणाचा "कोडवर्ड"ही समोर आला. कुरकुंभ एम आय डी सी येथील एका कारखान्यात तयार होत असलेल्या ड्रग्सला "कोडवर्ड" दिला होता. एमडी ड्रग्स बनवायच्या फॅार्म्युलाचा कोड वर्ड "न्यू पुणे जॅाब" असा होता. कुरकुंभ येथील असणाऱ्या अर्थकेम कारखान्यात एम डी ड्रग्ज तयार केले जात होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ येथे केलेल्या कारवाईत 650 किलो एवढे 1100 कोटी रुपयांचे एम डी ड्रग्ज जप्त केले होते. "न्यू पुणे जॅाब" ची जबाबदारी युवराज भुजबळवर होती, असे तपासात समोर आलेय. भुजबळ हा केमिस्ट्री विषयातील पी एच डी धारक असून त्याला डोंबिवली मधून अटक करण्यात आली. ॲाक्टोबर 2023 पासून सुरू होती एम डी ड्रग्जची निर्मीती करत होता. अँटी मलेरिया ड्रग कॅांपोनंट आणि ॲंटीरस्ट हे 2 रसायन कुरकुंभ मधील कारखान्यात तयार होत होते.
पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई
पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई मागील तीन ते चार दिवसांत झाली आहे. तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड, सांगली आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेकडून वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनगरमधील गोदामातून 55 किलो ड्रग्ज जप्त केला. दौंडमधील कुरकुंब एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापेमारीत करत पोलिसांनी 600 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले.