पुणे : पुण्यात कुख्यात ड्रग्ज (Pune drug) माफिया ललित पाटील (lalit patil) पलायन प्रकरण सध्या सुरू असताना शिक्षणाच्या माहेरघरात गेल्या 10 महिन्यात 14 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. शांत, सुसंस्कृत शहराचे चित्र आता एक "ड्रग्ज हब" बनू लागल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे. शिक्षणाच्या माहेरघरात तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे का? , असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. 


10 महिन्यात शिक्षणाच्या माहेर घरात 14 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. "उडता पुणे" मध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्स येतंय कुठून?, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र धडाधड कारवाया करत पुणे पोलीस ड्रग्जचा साठा जप्त करत आहे. कारवाईतून समोर आल्याप्रमाणे नायजेरिया, घाना, राजस्थान, आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात गांजा आणि मेफेड्रोनचा पुरवठा होत असल्याचं समोर आलं आहे. 


तरुणवर्ग अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन झाल्यामुळे राज्यात अंमली पदार्थाच्या तस्करी आणि विक्रीत मोठी वाढ झाली आहे. ड्रग्सचे व्यसन पूर्वी उच्चभ्रू लोकांपर्यंत मर्यादित होते. मात्र आता ड्रग्सचा विळखा मोठमोठ्या आयटी कंपन्यांची कार्यालये, महाविद्यालीन विद्यार्थ्यांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत पोहचला आहे. ड्रग्समधून होणारी कमाई कोट्यवधीमध्ये असल्याने अनेक दलाल यामध्ये सक्रिय असतात. 


बंदी असताना बेधडक विक्री सुरु...


राज्यात अंमली पदार्थ विक्रीवर बंदी आहे. असं असताना राज्यात ड्रग्ससह सर्वच अंमली पदार्थांची बेधकडक विक्री चालू आहे. ड्रग्स, गांजा यासारख्या अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ड्रग्ज तस्कर इंटरनेटचा वापर करतायत. पुण्यातील गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या ललित पाटील पलायन प्रकरणाच्या मुळाशी देखील मेफेड्रोन या अमली पदार्थाची तस्करी हाच विषय आहे. गेल्या 10 महिन्यात पुण्यात 1038 किलो गांजा तर 120 किलो अफिम जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. एकंदरीत गेल्या 10 महिन्यात पुण्यात तब्बल 14 कोटी रुपयाचे ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे.



सर्वाधिक आमली पदार्थ जप्त आकडेवारी


मेफेड्रोन: 7 कोटी 91 लाख 66 हजार (39 गुन्हे)


गांजा: 3 कोटी 7 लाख 90 हजार (50 गुन्हे)


एल एस डी: 1कोटी 12 लाख 64 हजार (2 गुन्हे)


चरस: 48 लाख 2 हजार (4 गुन्हे)


अफिम: 47 लाख 82 हजार (9 गुन्हे)


हेरॉईन: 46 लाख 89 हजार (1 गुन्हे)


पोलिसांसमोर मोठं आव्हान


गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात ड्रग्स अतिशय सहजपणे उपलब्ध होत आहेत, ज्यामधे गांजा असेल किंवा पार्टी ड्रग्स म्हणून ओळखले जाणारे एल एस डी किंवा एम डी याचा सर्वाधिक वापर होताना दिसतोय. हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: भूषण पाटील अन् साथीदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात न्यायाधीशांनी पोलिसांना काय सुनावलं?