पुणे : तांबडी जोगेश्वरी (tambadi jogeshwari), काळी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी असे रंगांचे नाव या जोगेश्वरी मंदिरांना का मिळाले? याच्या मागे एक (Pune History) रंजक कथा आहे. नवरात्र उत्सव जवळ आला आहे म्हणून आम्ही तुम्हाला पुण्यातील या तीन ऐतिहासिक जोगेश्वरीच्या मंदिराच्या कथा आणि आख्यायिका सांगणार आहोत. येणारं संकट टाळावं म्हणून जुन्या काळी गावाच्या वेशी बाहेर ग्रामदेवतेचे मंदिर बांधायचे. शहराच्या विस्तारामुळे आता हीच मंदिरे पुण्याच्या मध्यभागी आली आहेत. ही मंदिरं ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहेत.
तांबडी जोगेश्वरी मंदिर
तांबडी जोगेश्वरी मंदिराला पुण्याचं ग्रामदैवत म्हटलं जातं. या मूर्तीचे मूर्तिकार कोण आहे?, हे न कळल्यामुळे ही मूर्ती स्वयंभूच आहे अशी लोकांची खात्री झाली. ही मूर्ती उभी असून चतुर्भुज आहे. जोगेश्वरी, माहेश्वरी, सावित्री आणि चामुंडा या सर्व देवींचे एकत्रित असे स्वरूप या मूर्तीमध्ये बघायला मिळते. देवीच्या वरच्या दोन हातांपैकी डाव्या हातात डमरू आणि उजव्या हातात त्रिशूळ आहे. खालच्या दोन हातात मुंडके आणि कमंडलू आहे. मूर्तीच्या पार्श्वभागी एक दगड आहे.
भविष्यपुराणात ‘तां नमामि जगदधात्री योगिनी पर योगनी’ अशा शब्दात योगेश्वरीचे वर्णन केलेले आढळते. योगेश्वरी म्हणजेच जोगेश्वरी. पेशवे यांचं कुलदैवत म्हणजे कोकणातल्या श्रीवर्धन इथली योगेश्वरी. मात्र त्यांचं वास्तव्य पुण्यात असल्यानं त्यांनी जोगेश्वरीला आणलं आणि तिलाच कुलदैवत मानू लागले. त्यामुळे कुठल्याही लढाईच्या आधी पेशवे इथे येऊन देवीचा आशीर्वाद घेऊन मग पुढे जायचे.
तांबडी जोगेश्वरी हे नाव कसं पडलं?
तांबडी जोगेश्वरी हे नाव कसं पडलं तर महिषासुराचे बारा सेनापती होते. त्यात ताम्रसुर नावाचा एक सेनापती होता. त्याचा वध या देवीने केला त्यामुळे या देवीला ताम्र जोगेश्वरी म्हणू लागले. पुढे जाऊन ताम्रचे तांबडी जोगेश्वरी झाले.
काळभैरव यांची पत्नी ही काळी जोगेश्वरी...
पुण्यात तांबडी जोगेश्वरी प्रमाणेच काळी जोगेश्वरीदेखील आहे. पुण्यातल्या काळ्या जोगेश्वरीची देखील अशीच रंजक कथा आहे. पेशवेकालीन असलेल्या या मूर्तीचेदेखील वेगळे वैशिष्ठ्य आहे. श्रीमंत दगडूशेठ दत्त मंदिराच्या डाव्या हाताला काळ्या जोगेश्वरीचे मंदिर लागते. या मंदिराची रंजक कथा आहे. या जोगेश्वरीची मूर्ती जयपूरमधून बनवून आणली होती. या जोगेश्वरीच्या नाव काळी जोगेश्वरी कसे पडले तर जोगेश्वरी ही श्री काळभैरव यांची पत्नी होती. काळभैरव हे शंकराचे उग्र रूप आहे. जोगेश्वरीच्या देवळात काळभैरवाची मूर्ती असलेले हे एकमेव स्थान आहे. ही 2 फुटाची मूर्ती आहे. तिचे दर्शन घ्यायला नवरात्रीत प्रचंड गर्दी होते. या परिसराला काळे वावर म्हणायचे आणि म्हणून तिला काळी जोगेश्वरी असे नाव पडले.
पिवळी जोगेश्वरीचं काय वैशिष्ट्य आहे?
तीन जोगेश्वरी मधली तिसरी जोगेश्वरी म्हणजे पिवळी जोगेश्वरी. शुक्रवार पेठेतील ही जोगेश्वरी पिवळी जोगेश्वरी म्हणून का ओळखली जाते यामागे अतिशय सुरस कारण आहे. पण पुण्याच्या शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिर आहे. हे मंदिर खासगी असून महाजन कुटुंबाकडे आहे. साधारण 200 वर्षांपेक्षा जुने असलेले हे मंदिर अतिशय खास आहे. तुमचे लग्न ठरत नसेल तर मुलं मुली इथ येऊन देवीला नवस बोलायचे आणि त्यांचे हात पावले व्हायचे म्हणून पिवळी जोगेश्वरी असे नाव पडले.