पुणे : पुण्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे 15 रुग्ण आढळून आले आहेत. आणखी 21 जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पुणेकरांना करण्यात आलं आहे. याशिवाय पुण्यात आजपासून मॉलमधील फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकानंच सुरु राहणार असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे. गेल्या 24 तासात पाच नवीन संशयित रुग्ण आढळले असून एकूण 57 रुग्ण संशयित आहेत. कालच्या पाच रुग्णांपैकी चार जण हे फर्स्ट कॉन्टॅक्ट आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून मॉल्समधील ड्रग्स, भाजीपाला आणि गरजेच्या वस्तूची दुकानं सुरु राहतील. मात्र कपडे किंवा इतर दुकानं बंद राहतील. महाविद्यालयांच्या परीक्षा होऊपर्यंत हॉस्टेल खाली करु नये. परीक्षा सुरु असेल हॉस्टेल सोडू नये. विद्यार्थ्यांनी परीक्षा नसेल विनाकारण फिरु नये. 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.
कोरोना संशयी रुग्ण आढळल्यास त्यावर खासगी आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालये एकत्र उपचार करणार आहेत. खासगी रुग्णालये रुग्णाची माहिती प्रशासनाला देतील. घरी आयसोलेट केलेल्या रुग्णांना त्रास न देण्याचं आवाहनही विभागीय आयुक्तांनी केलं आहे. कोरोनाविषयी खोट्या बातम्या अथवा मेसेज पसरवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. त्यासाठी 24 तास यंत्रणा काम करत आहे, असंही विभागीय आयुक्तांनी सांगितलं.
पुण्याची कोरोनाग्रस्त 15 रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. माभ रुग्णांमध्ये वाढ झाली तरी कुणीही घाबरु नये, स्वत:ची काळजी घ्यावी. एखाद्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकणे पुरोगामी समाजाला शोभणारं नाही. कोरोनाची लागण पाप नाही, हे दुर्दैव आहे. रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबियांवर बहिष्काराची घटना समोर आल्यास गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.
#CoronaVirus मुंबईत आजपासून जमावबंदी लागू, 31 मार्चपर्यंत मुंबईतील टुर्स बंद
राज्यात कोरोना बाधितांची संख्या 32 वर
- पुणे - 15
- मुंबई - 5
- ठाणे - 1
- कल्याण- 1
- नवी मुंबई - 1
- पनवेल - 1
- नागपूर - 4
- अहमदनगर - 1
- यवतमाळ -2
- औरंगाबाद - 1
संबंधित बातम्या :
- राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर, मुंबईत आजपासून जमावबंदी लागू, प्रशासनासमोर आव्हान
- इराणमधल्या अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले
- #Coronavirus | मुंबई आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
- बेळगावमध्ये दोघांची कोरोना वार्डात तपासणी