पुणे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी मुळशीचे सुनील चांदेरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे यांच्यातल्या चर्चेनंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण 21 जागांपैकी 17 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला तर काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीच्या आधीच आधीच 14 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर सात जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं. 


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे एकहाती वर्चस्व असल्याने तो म्हणतील त्यालाच अध्यक्षपद मिळणार होतं. त्यानुसार त्यांनी पुरंदरच्या डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाला पसंती दिली. त्यानंतर दुर्गाडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 


अध्यक्षपदाच्या या घोषणेनंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बँक आहे. एका विचाराची लोक एकत्र आली आणि निवडून आली आहेत. पण आता बँका चालवणे अवघड झालेले आहे, अनेक नियमावली येत असतात. संचालकांनी पारदर्शक कारभार करावा, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी. धोरणात बसत असेल त्यांना मदत करावी."


पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांची निवड झाल्याने झाल्यानंतर पुरंदर तालुक्यातील वाल्हे या गावात जल्लोष करण्यात आला आहे. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावचे रहिवासी आहेत. पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे कळताच गावात फटाके फोडून, गुलाल उधळून आणि पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.


महत्त्वाच्या बातम्या :