Pune: पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोकसावंगी आणि हिवरे ग्रामपंचायतींमध्ये पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण आला आहे. रांजणगाव गणपती गावाची लोकसंख्या मूळची अवघी 11 हजार असली तरी लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर सुविधा कोलमडू लागल्या आहेत. या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना दिले.

Continues below advertisement


रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसावंगी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन, ग्रामविकास आणि नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, पीएमआरडीएचे आयुक्त यांच्यासह एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.


रांजणगावसह या गावांसाठी अजित पवारांचे निर्देश 


रांजणगाव गणपती हे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे स्थान आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शिवाय गावाच्या लगत एमआयडीसी क्षेत्र असल्याने स्थलांतरित लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा पार्श्वभूमीवर गावातील पायाभूत सुविधा सक्षम करणे ही अत्यावश्यक गरज आहे. पवारांनी स्पष्ट निर्देश दिले की, या भागातील वाढती लोकसंख्या आणि भाविकांचा ओघ लक्षात घेऊन एमआयडीसीने विकास कामे करताना जिल्हा परिषदेशी समन्वय साधावा. तसेच रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण यासारख्या मूलभूत सोयींसाठी तातडीने निधी आणि कामे सुरू करावीत.


रस्ते चिखलमय, कचऱ्याचे ढीग 


गावांचे प्रतिनिधी, सरपंच व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आपले प्रश्न थेट मांडले. त्यांनी वाढत्या लोकसंख्येला तोंड देताना पाणीपुरवठा योजना कोलमडत असल्याचे, रस्ते चिखलमय झाल्याचे, कचऱ्याचे ढिग वाढत असल्याचे सांगितले. यावर अजित पवारांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना सुरू करा असे आदेश दिले.बैठकीत ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी पायाभूत सुविधांबाबत अडचणी मांडल्या. त्यावर अजित पवारांनी प्रशासनाला वेगवान कारवाई करण्याचे आदेश दिले. गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. या बैठकीला संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि अधिकारी उपस्थित होते. पावसामुळे व लोकसंख्येच्या ताणामुळे निर्माण झालेल्या समस्या लवकर सोडविण्यात येतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली.