पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने (Cyber Crime)कळस गाठला आहे. त्यात प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पुण्याला आयटी हब म्हटलं जातं त्यात पुण्यात अनेक आयटी कंपन्या आहेत. मात्र याच पुण्यात सायबर गुन्ह्यांची संख्यादेखील तितकीच झपाट्याने वाढताना दिसत आहे. साधारण एका दिवसाला किरकोळ आणि मोठ्या आकड्यांची फसवणूक झालेल्या तक्रारींची संध्या बघितली तर अनेकांच्या भूवया उंचावणारी आहेत. पुणे शहरात साधारण एका दिवसाला 41 सायबर क्राईमच्या तक्रारीं दाखल होतात. जानेवारी महिन्याची आकडेवारी पाहिली तर एका महिन्यात 1249 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 250 हून अधिक तक्रारी 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. 


ट्रेडिंग फ्रॉड, टास्क फ्रॉड, फेडेक्स फ्रॉड, मॅन ईन मिडल फ्रॉड, फेसबूक फ्रेन्ड रिक्वेस्ट फ्रॉड मेट्रिमोनी फ्रॉड (लग्न जमविणा-या साईटवरुन होणारे फ्रॉड ), सेक्सटॉर्शन, लोन अॅप याव्दारे ऑनलाईन फसवणूक तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL), गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), सायबर गुन्हे समन्वय केंद्र (14C) या केंद्रीय एजन्सींच्या नावाचा गैरवापर करून होणा-या ऑनलाईन आर्थिक फसवणुकी या गुन्ह्यांचा समावेश आहे. 


जास्त नफ्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक!


सध्याच्या युगात इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया जसे फेसबूक, व्हॉटस्अॅप, व्टिटर, इन्स्टाग्रामचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरीकांपर्यंत इंटरनेटचा सर्रास वापर सुरु आहे. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन खरेदी- विक्री ऑनलाईन खादयपदार्थ मागविणे हे प्रकारे ऑनलाईन सर्व्हिस पुरवणा-या संस्थांकडून प्रिपेड सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. अशा चांगल्या सुविधांबरोबरच काही समाजकंटक हे त्या सुविधांचा गैरवापर करुन नागरिकांना भिती दाखवून प्रलोभने देवून, जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. तसेच काही समाज माध्यमांचा वापर करुन फोटो मॉर्फ करुन महिलांना असे अश्लील फोटो पाठवून त्यांचेकडून पैसे उकळण्याचे गैरप्रकार देखील करताना दिसतात.


विविध केंद्रीय एजन्सींच्या नावाने फसवणूक


आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL), गुप्तचर विभाग (IB) केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) यांसारख्या विविध केंद्रीय एजन्सींच्या नावाचा गैरवापर सायबर गुन्हेगारांकडून पैसे उकळण्यासाठी केला जात असून अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटना देशभरात घडत आहेत. विविध केंद्रीय एजन्सींच्या उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगार खोट्या सहयांचे बनावट पत्र तयार करत असून पत्र बनावट ईमेलने नागरिकांना पाठवले जातात. ईमेलने नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईची भिती दाखवून ऑनलाईन पैसे भरण्यासाठी भाग पाडून आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. 


भीती न बाळगता लगेच तक्रार करा!


 नागरिकांनी फसवणूक झालेले बनावट ईमेल किंवा या सगळ्यासंदर्भात काळजी बाळगावी. सोशल मीडियावर बदनामी झाल्यास काय?  याची भिती न बाळगता स्वतः सोबत घडलेल्या फ्रॉडबाबत तसेच कारवाईच्या भितीस बळी न पडता अशा फसवणुकीच्या घटनांबाबत आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला सायबर पोलीस स्टेशन crimecyber.pune@nic.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करावी. नाहीतर  /020 - 297710097, 7058719371या नंबरवर तक्रार नोंदवावी, असं आवाहन पुणे सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Mobile Safety Tips : तुमचा फोन तुमच्या नकळत टॅप होतोय? चिंता सोडा, फक्त 'हे' 5 मार्ग फॉलो करा