पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहे. आधी कोलकाता, नंतर मुंबई, पुणे, अकोला अनेक ठिकाणी अत्याचारांच्या धक्कादायक घटना समोर आल्या, अशातच बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसर परिसरातील एका खोलीत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे यश उर्फ सोन्या आटोळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय घडलं?
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या 14 सप्टेंबरला घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या. बसने त्या पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले.
मुलींपाठोपाठ तो ही बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारु पाजून या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने त्यांचे आळीपाळीने लैंगिक शोषण केले. दरम्यान यातील एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले.
16 तारखेला या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणलं. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना या दोघींनी दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यानुसार सुरुवातीला ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे समोर आली. त्यानुसार बेंगारे व सोन्या आटोळे या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील चौथा आरोपी अद्याप फरार आहे.
पुण्यात एका व्यक्तीनं केली पत्नीच्या प्रियकराची हत्या
पुण्यात एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सध्या सुरू आहे. पत्नीचा प्रियकरासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर संतापलेल्या पतीनं साथीदारासह कट रचला आणि पत्नीच्या प्रियकराला यमसदनी धाडलं.
पत्नीच्या प्रियकराला संपवलं
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राजीव कुमार आणि धीरज कुमार यांना अटक केली आहे. राजीव कुमार हे बिहारमध्ये शिक्षक असून त्यांचा पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. या तणावातून राजीवनं ही घटना घडवून आणली. दरम्यान, राजीव कुमार यांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराचा व्हायरल झालेला फोटो एकत्र पाहिला होता. प्रवीणकुमार महतो असं मृत व्यक्तीचं नाव आहे.