पुणे : पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 18 वर्षांच्या कामगार युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी या एक व्हिडिओ देखील बनवला होता. या व्हिडिओतून त्याने आपल्या कुटुंबाबद्द असणारी काळजी आणि दोन बहिणींप्रती असलेलं प्रेमही व्यक्त केलं आहे. युवकाने मृत्युपूर्वी आपल्या कुटुंबाला पाठवलेला व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावरती व्हायरल झाला असून या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय 18) हा पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी येथील देहूरोडमध्ये कन्स्ट्रक्शन इमारतीमध्ये तो तरूण कामाला होता. मात्र, नैराश्यातून व आर्थिक विवंचनेतून त्याने असं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे. याप्रकरणी, पोलीस (police) अधिक तपास करत आहेत.
या तरूणाने टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'मम्मी, मला मरायचं आहे, मी विष प्यायलो आहे, मी मोबाइल फोडून टाकतोय. पुरावा राहणार नाही, मी लोकेशन पाठवलं आहे. येऊन माझा मृतदेह घेऊन जा...' अशी ऑडिओ आणि व्हिडीओ क्लीप आईला पाठवून या 18 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. मावळ तालुक्यातील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी त्याचा मृतदेह आढळला आहे. संजयकुमार विनोदकुमार राजपूत (18, रा. काळेवाडी), असे या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयकुमार यांचे आई-वडील आणि दोन बहिणी काळेवाडी येथे राहतात. तो देहूरोड येथील विकासनगर येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.
त्याने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?
"जसे इतर लोक मरतात, तसा मी ही मरेन. मला आणखी कोणाशी काही बोलायचं नाही. मला बाकी काही नको. माझ्या आई-वडिलांना एवढंच सांगायचं आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका. मला फक्त माझ्या बहिणींची चिंता आहे. या व्यतिरिक्त या जगात कुणाची चिंता नाही. त्यांचं पालनपोषण चांगलं व्हायला हवं", असं संजयकुमारने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
17 तारखेपासून बेपत्ता
देहूरोडमध्ये कंस्ट्रक्शन इमारतीवर कामावर असलेला हा संजयकुमार हा युवक 17 तारखेपासून बेपत्ता होता. त्यामुळे, देहूरोड पोलीस स्टेशनला त्याची मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने तांत्रिक तंत्रज्ञानच्या आधारे या बेपत्ता तरुणाचा शोध लावला. मात्र, पोलिसांच्या हाती त्याचा मृतदेह लागला, या मृतदेहा शेजारी एक विषाची बाटली पोलिसांना सापडली आहे. त्यामुळे, या युवकाने विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवल्याचे निष्पन्न झालं आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.