पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांसंबधीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यात (Pune Crime) तरूणीवर एकतर्फी प्रेमातून ब्लेडने वार करण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 'तू माझी झाली नाही तर, मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही' असे म्हणत तरुणीला ब्लेडने वार करण्याची धमकी (Pune Crime) दिली आहे. या प्रकरणी एकावर सिंहगड रोड पोलिस (Pune Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या धमकीनंतर तरुणीने यासंबधी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल केला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, दीपक प्रकाश गायकवाड याच्यावर विनयभंगासह धमकी दिल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. पुण्यातील धायरी परिसरात ही घटना घडली आहे. साधारण दीड महिना तरुण तरुणीला धमकी देत असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीला रस्त्यात अडवून जबरदस्तीने अंधारात नेत तिच्यासोबत असभ्य वर्तन आरोपीने केले. त्याचबरोबर 'तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्यावर ब्लेडने वार करीन. तू माझी नाही झाली तर मी कोणाचीच होऊ देणार नाही', अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, हा संपुर्ण प्रकार धायरी परिसरात जून 2024 ते 19 जुलै 2024 या कालावधीत वारंवार घडला होता. तरूणीने याला कंटाळून सिंहगड रोड पोलिसात धाव घेतली घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला त्यानंतर पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिपक प्रकाश गायकवाड याच्यावर कलम 74, 75, 78, 115, 352, 351(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेबाबत पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी रस्त्यावरुन येत-जात असताना आरोपीने तिचा अनेकदा पाठलाग केला होता. त्याचबरोबर पीडित तरुणी धायरी येथील रोडवरुन जात असताना आरोपीने दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला. दुचाकी आडवी लावून तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. धायरी परिसरातील एका मंदिराजवळ दुचाकी आडवी लावून मुलीला गाडीवर बसण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत असभ्य वर्तन केले.
तसेच तु माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्यावर ब्लेडने वार करीन. तु माझी नाही झाली तर मी मी कोणाचीच होऊ देणार नाही असे म्हणून शिवीगाळ करुन धमकी दिली.तसेच मुलीचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.