Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याची (Pune) ओळख आता क्राईम कॅपिटल (Crime Capital) म्हणून होते की काय असं चित्र निर्माण झालं आहे. हे कदाचित तुम्हाला पटणार नाही. मात्र मागील काही दिवसात पुण्यात घडलेल्या घटनांनी अक्षरशः महाराष्ट्र हादरला आहे. कधी बलात्कार, प्रेमातून हत्या, गाड्यांची तोडफोड तर कधी अल्पवयीन मुलांकडून होत असलेली अमली पदार्थांची विक्री... या सगळ्या घटना पाहून पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.


पुण्यात घडलेल्या घटना


1. सलग तीन दिवस कोयता गँग ने पुण्यातील वेगवेगळ्या परिसरात किमान 80 गाड्या फोडल्या


2. दर्शना पवार हत्या प्रकरण : एमपीएससी टॉपर मुलीची हत्या केली, तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सापडल्याने खळबळ उडाली होती. राहुल हांडोरे असं हत्या केलेल्या आरोपीच नाव होतं.


3. ज्येष्ठ नागरिकाने आयुष्य संपवलं : हळदी समारंभातील स्पीकरच्या आवाजावरुन निर्माण झालेला वाद पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर बेतला आहे. वादादरम्यान अपमानित झालेल्या या ज्येष्ठ नागरिकाने बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. ज्ञानेश्वर साळुंखे (वय 70 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. तर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.


4. पुण्यात अल्पवयीन मुलं अमली पदार्थ विकत असल्याचं मागील काही दिवसात समोर आलं आहे. आपली हौस पूर्ण करण्यासाठी पैसे हवा म्हणून ही मुलं अंमली पदार्थ विकत असल्याचं समोर आलं. मागील सहा महिन्यात सात कोटींचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे.


5. आईने अल्पवयीन मुलीच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा : पुण्यात अल्पवयीन मुलीच्या प्रियकरासोबत मिळून महिलेने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. जॅाय लोबो असं मृताचं नाव असून पत्नी सॅन्ड्रा लोबो आणि तिच्या मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी ही घटना घडली आहे 


6. हुंड्यावरुन वाद! तरुणाला मानवी विष्ठा आणि लघवी पिण्यास पाडलं भाग; लग्न आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका 21 वर्षीय युवकाला मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर, लिंबू-हळद लावून शिव्या-शाप देत त्याला लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडल्याची खळबजनक घटना इंदापूर तालुक्यातील काटी गावात घडली आहे. मानवी विष्ठा खाण्यासह लघवी पिण्यास आणि गुद्द्वार चाटण्यास भाग पाडल्याचा प्रकार इंदापुरात घडला आहे. या प्रकरणी 11 आरोपींविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेवरुन सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.


7. एकतर्फी प्रेम, तरुणीचा नकार अन् तीन राजकीय नेत्यांना धमकीचे फोन : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकीचे फोन करुन खंडणीची मागणी केली जात आहे. यामध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचा समावेश आहे. या धमकीच्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या तीनही राजकीय नेत्यांना एकाच व्यक्तीने फोन करुन धमकी दिल्याचं समोर आलं आहे. एकतर्फी प्रेमातून मुलीला धडा शिकवण्यासाठी या तरुणाने मुलीच्या नावे नेत्यांना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. वसंत मोरेंना धमकी दिल्याप्रकरणी या तरुणाला अटक करण्यात आली होती पण त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र सुटकेनंतरही त्याने आपले प्रताप सुरुच ठेवले आणि अविनाश बागवे आणि महेश लांडगे यांनी धमकी दिली. त्याप्रकरणी पुन्हा या तरुणाला अटक करण्यात आली आहे.


8. रिक्षा चालकाने तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता पुण्यात मुलीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झालं आहे.