Pune Crime News : पुण्यातील सदाशिव पेठेत (Pune Crime News) तरुणीवर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्र हादरला. या हल्लेखोराला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने जबाबात तरुणीवर हल्ला का केला?, याचं कारण सांगितलं आहे. हे कारण ऐकून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यावरुन मुलींना आपलं मत मांडण्याचा किंवा मित्र निवडायचा अधिकार आहे की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 


पोलिसांनी चौकशी केली असता तरुणीने प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून हल्ला केल्याचा जबाब हल्लेखोराने दिला आहे. त्यामुळे सर्व स्तरावरुन आता संताप व्यक्त केला जात आहे. शंतनू जाधव, असं हल्लेखोराचं नाव आहे. शंतनूवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी दोन तरुणांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी त्याने हा जबाब नोंदवला आहे.


या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी शंतनुच्या रक्ताच्या काही चाचण्या करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सोबतच त्याच्याकडे असलेला कोयता त्याने कुठून आणला. याचा देखील तपास पोलीस करत आहेत. 


Pune Crime News : मानसोपचार तज्ञ काय सांगतात?


सध्या नात्यांची रचना बदलत चालली आहे. नातेसंबंधांमध्ये विरह निर्माण होऊन त्यातून अशा घटना घडत असल्याचं समोर आलं येत आहे. ग्रामीण भागातील मुलं जेव्हा शहरात राहायला येतात तेव्हा त्यांना आपलं असं कोणीतरी हवं असतं. त्यातून या प्रेमाला सुरुवात होते. त्यानंतर अभ्यास आणि प्रेम दोन्ही गोष्टी एकत्र सुरु असतात. यात भावनांची सांगड घालणं अनेक तरुण-तरुणींना जमत नाही. एकीकडे अभ्यास असतो तर दुसरीकडे प्रेमही तेवढंच असतं. मात्र सांगड न घालता आल्याने दोघांमध्ये खटके उडू लागतात. त्यानंतर वादावादी सुरु होते आणि अखेर दोघंही वेगळं व्हायचा निर्णय घेतान दिसतात. त्यानंतरही अनेकांमध्ये वादविवाद होतात आणि अशा प्रकारचे हल्ले किंवा ठार मारण्यासारखे टोकाचे निर्णय घेतले जातात, असं मानसोपचार तज्ञ अनिकेत कासार सांगतात. 


दोन प्रकारे अशा प्रकारच्या कृती केल्या जाऊ शकतात. पहिलं म्हणजे अचानक राग अनावर होतो आणि तडकाफडकी मारण्याचा किंवा इजा पोहोचवण्याचा निर्णय घेतला जातो किंवा राग आणि बाकी नातं पाहून कट रचून तिला संपवण्याचा किंवा इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना नकार पचवणं कठीण जातं आणि यातूनच हे अघोरी कृत्य केलं जात असल्याचं कासार सांगतात. 


हेही वाचा -


Pune Crime News : पुण्यात तरुणीवर कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई; तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन