पुणे : स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला तपासासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक काल शुक्रवारी (दि. 7) गुनाट गावी घेऊन गेले. पोलिसांनी आरोपीच्या लपलेल्या ठिकाणी शोधमोहीम राबवली. मात्र, संपूर्ण शेत धुंडाळूनही गाडेचा मोबाइल मिळाला नाही. त्याच्या घराची झडती घेत सहा जणांचे जबाब नोंदवण्यात आले. पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केल्यानंतरही आरोपी दत्तात्रय गाडे सुमारे अर्धा ते पाऊण तास स्वारगेट एसटी स्थानक परिसरातच फिरत होता. पोलिसांनी तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता आरोपी परिसरात निर्धास्तपणे फिरताना स्पष्टपणे आढळून आला. दरम्यान पोलिस दत्ता गोडेच्या फोनचा शोध घेत आहेत.
शेतात मोबाईल फेकल्याचा संशय
स्वारगेट एसटी स्थानकात 25 फेब्रुवारीला पहाटे साडेपाचच्या सुमारास आरोपीने एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला. त्यानंतर तो फरार होऊन गुनाट गावातील शेतात तीन दिवस लपून बसला होता. पोलिसांना गाडेने शेतातच मोबाईल फेकल्याचा संशय असून, त्यातून महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या लपण्याच्या ठिकाणी शोधमोहीम राबवली.
मोबाईल अपघाताने पडला असल्याचा दत्ता गाडेचा दावा
शुक्रवारी सकाळी वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 45 जणांचे पथक गुनाट गावी पोहोचले. प्राथमिक तपासात गाडेने शेतात मोबाईल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आरोपीचा दावा आहे की मोबाईल त्याने फेकला नसून खिशातून अपघाताने पडला. त्यामुळे पोलिसांना शोधमोहीमेत अडचणी येत आहेत. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, आरोपीच्या मोबाइलमधील पुरावे महत्त्वाचे ठरू शकतात.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाईल शोधण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक आरोपीसह शुक्रवारी गुनाट गावात पोहोचले. आरोपी लपून बसलेल्या शेतामध्ये पोलिसांनी दिवसभर मोबाईल शोधला. मात्र, मोबाईल सापडला नाही. दरम्यान, फरार कालावधीत गाडेला मदत करणारे किंवा ज्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी तो गेला होता, अशा जवळपास सात लोकांचे जबाब पोलिसांनी घेतले; तसेच गाडेच्या घराची देखील झडती घेण्यात आली.
पाच वाजेपर्यंत शोध
गुन्हा केल्यानंतर सर्व प्रथम गाडे कुठे गेला, कसा गेला, तो कुठे कुठे लपून बसला होता. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली का? याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. गुन्हे शाखेने गाडे गुनाट गावात लपलेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्याचबरोबर त्याच्या मोबाईलचा शंभर एकराच्या शेतात दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेतला. मात्र, मोबाईल सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी या सहा व्यक्तींचा जबाब नोंदवला.
तरकारीच्या गाडीतून पळ काढला
गुन्हा केल्यानंतर आरोपीला कोणतीही भीती वाटली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गाडेने स्वारगेट परिसरातून एका तरकारीच्या गाडीत बसून सोलापूर रस्त्यावरून त्याने आपलं गाव गाठलं.