Pune Crime News : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत चांगलीच वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोयता गॅंगनेदेखील धुमाकूळ घातला होता. त्यातच आता किरकोळ कारणांवरुन हल्ले आणि अवैध ड्रग्ज विक्रीचे प्रकरणंदेखील समोर आले आहेत. याच सगळ्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरात 2880 नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या हालचालींवर पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. 


गेल्या दशकभरात घडलेल्या गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन चोरी, दरोडे, मारामारी आणि अपघातांची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.


सध्या पुण्यात गुन्हे अन्वेषणासाठी सुमारे 1400 सीसीटीव्ही कॅमेरे प्रामुख्याने वाहतुकीच्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनी सातत्याने गुन्हे घडत असलेल्या विशिष्ट ठिकाणांची यादी तयार केली आहे. त्याच भागात पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2,880 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन केले आहे. तसेच दुकानांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पोलीस दुकानदारांचे सहकार्य घेणार आहेत. या कॅमेऱ्यांमधील फुटेज फायबर ऑप्टिक कनेक्शनद्वारे पोलिसांच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहे.


मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही सोयीचे


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक प्रकारचे गुन्हे घडत असतात. याच सगळ्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्वाची भूमिका बजावत असतात. आतापर्यंत अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या प्रकरणाची उकल करण्यासाठी आणि गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला आहे. मात्र गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने आणि गुन्हेगारी आवाक्याबाहेर जात असल्याने काही विशिष्ठ परिसरात सीसीटीव्ही वाढवण्याचं नियोजन केलं आहे. 


सीसीटीव्हीमुळे गुन्हेगार जेरबंद


कालच घडलेल्या एका घटनेचा तपास करण्यासाठी 230 सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगारांना जेरबंद केलं आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकरासोबत मिळून महिलेने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी जॅाय लोबो असं मृताचं नाव असून पत्नी सॅन्ड्रा लोबो आणि तिच्या मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबेयांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी ही घटना घडली होती. याच घटनेच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी तब्बल 230 सीसीटीव्ही तपासले. मुलीचं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी आणि स्वतःच्या प्रेमसंबंधामध्ये अडथळा न येण्यासाठी आईनेच मुलीच्या प्रियकराच्या मदतीने हा खून केला होता. पतीचा खून करत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला होता.