Pune Crime News : पुण्यातील (Pune News) वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) आता अॅक्शन मोडमध्ये आहेत. पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आलं आहे. यापूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली आहे. 


पोलिसांनी अगोदर या प्रकरणात गुन्हा दाखल न करता अदखलपत्र गुन्ह्याची नोंद केली होती.  त्यानंतरही ही घटना घडली. पोलिसांनी जर वेळीच दखल घेतली असती, तर तोडफोड टळली असती, असा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी निलंबनाती कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकार नगर परिसरात दोन गटांत हाणामारी झाली होती. यावेळी परिसरातील गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती. याचाच ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. सहकार नगर परिसरातील घटना घडल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं. परंतु, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. 


'या' पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन


सावळाराम साळगावकर, मनोज एकनाथ शेंडगे,समीर विठ्ठल शेंडे, हसन मकबुल मुलाणी, मारूती गोविंद वाघमारे, संदीप जयराम पोटकुले आणि  विनायक दत्तात्रय जांभळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तांकडून निलंबनाच्या कारवाईचा धडाका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या गुन्हेगारी वाढत चाललीये का? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपूर्वीच्या घटनापाहून पडतोय. 


प्रकरण नेमकं काय? 


पुण्यातील  सहकार नगर परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणखी एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात एका टोळक्याने भरचौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने ) केक कापला होता. 21 जूनला मध्यरात्री ही घटना घडली होती. हा केक कापत असताना या टोळक्याने या ठिकाणी धिंगाणा घातला, आरडाओरडा केला होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिक काही काळ दहशतीच्या छायेत होते. दरम्यान सहकार नगर पोलिसांचा त्यांच्या हद्दीतील गुंडांवर वचक राहिला की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. त्यानंतर याच प्रकरणात एकमेकांविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल न घेतल्याने थेट निलंबन करण्यात आलं आहे.