Pune Crime News : सध्या लहान-मोठे अनेक गुन्हेगार(Pune Crime news) सोशल मीडियावर (Pune News) रिल्स व्हायरल करत असतात. या सगळ्याच गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी चांगलाच दम दिला आहे. पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सगळ्या गुन्हेगारांना धारेवर धरलं आहे त्यासोबत उपायुक्तांनी देखील गुन्हेगारांना तंबी दिली आहे. पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांची परेड काढण्यात येत आहे. यावेळी गुन्हेगारांना सज्जड दम दिला जात आहे. गुन्हेगारीचे स्टेटस ठेवायचे नाहीत, रिल्स टाकायचे नाही टाकले तर याद राखा, अशा शब्दात गुन्हेगारांना सज्जड दम दिला जात आहे.
पुण्यातील तब्बल 267 गुन्हेगारांची काल झडती घेण्यात आली. पुणे पोलीस आयुक्तालयात या गुन्हेगारांना उभे करून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत असल्याचे पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकायचे नाहीत असे खडेबोल पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी या गुन्हेगारांना सुनावले शेवटच्या सूचना आहेत, परत सूचना नाही दिल्या जाणार कारवाई होईल असा इशाराही पोलिसांनी या गुन्हेगारांना दिला आहे.
सध्या पुण्यात अनेक नवनव्या टोळ्या तयार होत आहे. टोळीतील अनेक गुन्हेगार हे दहशत माजवण्यासाठी सोशल मीडियावर रिल्स किंवा स्टेटस ठेवत असतात. त्यात हे रिल्स पाहून विरोधी टोळी आक्रमक होते आणि यातून वाद निर्माण होतात. एकमेकांच्या टोळीला डिवचण्याचा प्रकार या स्टेटस आणि रिल्समधून सुरु होतो. त्यामुळे कोणीही असे प्रकार केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
700 पोलिसांच्या होणार बदल्या
पुणे शहरातील 700 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या 14 फेब्रुवारीला होणार आहे. पाच वर्षांपासून अधिक काळ एकाच पोलिस ठाण्यात आणि विभागात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या समावेश असलेल्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. एकाच पोलिस ठाण्यात तसेच गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा आणि पोलिस मुख्यालयात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागवली आहे. येत्या 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी पोलिस कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहे. पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या या संबंधित पोलिस कर्मचार्यांना समोर बोलावून त्यांनी मागितलेल्या तीन पर्यायानुसार करण्यात येणार आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार रडारवर
पुण्यातील सगळ्या नामचीन गुन्हेगारांची पुणे आयुक्तालयात परेड काढण्यात आली त्यानंतर आज लगेच गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकांकडून अवैध धंदे आणि अंमली पदार्थ तस्कारांची पोलीस आयुक्त कार्यालयात परेड काढण्यात आली. मागील काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करीची प्रकरणं समोर आली त्यामुळे गुन्हेगारांनादेखील नवनियुक्त आयुक्तांनी दम दिला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलीस आयुक्तांच्या रडारवर आहेत.
इतर महत्वाची बातमी-