पुणे : नवीन कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर सगळेच सध्या (Pune Crime News) गुगलची मदत घेतात. आधारकार्ड, पॅनकार्डसंदर्भातील महत्वाची माहितीदेखील आपण गुगलवरुन घेतो. गुगलवर यासंदर्भातल्या अनेक महत्वाची माहिती देणाऱ्या बातम्या असतात. त्यात सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करुन आपण अनेकदा आपले कामं ऑनलाईन करतो. मात्र बँकेसंदर्भात गुगलवरुन माहिती घेणं हे (Cyber Crime) पुण्यातील एका जवानाला चांगलेच महागात पडलं आहे. यात या लष्करातील जवानाची 1 लाख 28 हजार 990 रुपयांची फसवणूक झाली आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील एका लष्करी जवानाने पंजाब येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची गुगलवरून माहिती घेतली होती. मात्र गुगल सर्च करणं या लष्करी जवानाला महागात पडलं आहे. त्यांच्यावर सायबर चोराने डाव साधला आणि बँक मॅनेजर बोलत असल्याचे सांगून 1 लाख 28 हजार 990 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी परवेशकुमार जोगंदर पाल (47 , रा. कॅम्प) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादीचे पंजाब राज्यातील पडोरी महंता जिल्हा गुरुदासपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियात जॉइंट अकाउंट आहे. हे अकाउंट बंद पडल्याने त्यांनी बँकेची माहिती गुगल सर्च करून पाहिली. त्यावेळी बँकेचा मोबाइल नंबर मिळाला. फिर्यादीने गुगलवरून मिळालेल्या नंबरवर यांनी फोन केला. त्यानंतर समोरुन सायबर चोरट्याने बँक मॅनेजर असल्याचे सांगितले. यानंतर चोरट्याने फिर्यादींना एक अॅप डाउनलोड करायला सांगितलं आणि फिर्यादीच्या मोबाइलची माहिती घेऊन पडोरी महंता येथील बँक अकाउंटमधून 1 लाख 28 हजार 990 रुपये परस्पर काढून घेतले.
यासंदर्भात माहिती मिळताच लष्करातील जवानाने पोलिसांत धाव घेतली. घडलेला सगळा प्रकार सांगितला. आपली फसवणूक झाल्याचं सांगितलं त्यानंतर हा प्रकार नेमका कोणी केला? याचं काही रॅकेट आहे का? नेमका कोणत्या शहरातून हे फ्रॉड केले जातात? या सगळ्याचा तपास लष्कर पोलीस करत आहे.
पुण्यात सायबर क्राईमचा सुळसुळाट
मागील काही वर्षांपासून पुण्यात सायबर क्राईमचा सुळसुळाट दिसत आहे. मागील वर्षभरापासून अनेकांना ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या अनेक महिन्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून ॲानलाईन फसवणुकीचे अर्थात फिशींग अनेक नवीन प्रकार या सायबर चोरट्यांनी आजमावले आहेत आणि याला नाहक बळी पडतोय तो म्हणजे सामान्य नागरिक. पोलिसांपेक्षा ॲानलाईन फसवणूक करणारे जास्त वेगवान झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. येत्या काळात सायबर गुन्हे थांबवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
इतर महत्वाची बातमी-