Pune Crime :  पेट्रोलिंग करत असणाऱ्या पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये मौजे दौड गावच्या हद्दीत राजवाडा हॉटेलजवळ रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली आहे. महेश सदाशीव भोसले असं मारहाण झालेल्या 38 वर्षीय पोलीस हवालदाराचं नाव आहे. दौंड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. भोसले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ऋषीकेश उर्फ सोन्या सुरेश साळेकर, किरण आकडे असं आरोपींची नावे आहेत. मात्र मारहाण केल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


नक्की काय घडलं?
पोलीस हवालदार महेश भोसले हे रोजप्रमाणे रात्री पेट्रोलिंग करत होते. रात्री 12 च्या सुमारास राजवाडा हॉटेल परिसरात त्यांना पाच जण अंधारात गाडी लावून थांबलेले दिसले. त्यावेळी भोसले यांनी या पाचही जणांची विचारपूस केली. त्यांना या ठिकाणी का थांबले, असे काही प्रश्न विचारले. त्यानंतर ऋषीकेश आणि किरण यांनी पोलीस असल्याचं पाहून अरेरावीची भाषा केली. त्यांच्या अंगावर जात त्यांनाच प्रतिप्रश्न करायला सुरुवात केली. तुम्ही काय आमचं वाकडं करणार अशा भाषेत धमकावण्याचा प्रयत्न केला, शिवाय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी करण्याचा देखील प्रयत्न केला. हा वाद वाढत गेला. त्यानंतर ऋषीकेशने पोलिसाच्या कानशिलात लगावली आणि मारहाण करायला सुरुवात केली. पोलिसांना मारहाण करुन सगळ्यांनी जागेवरुन पळ काढला. घडलेल्या प्रकाराबाबत भोसले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. 


पोलिसांच्या मारहाणीत वाढ
काही दिवसांपूर्वी पुणे शहरात पोलिसांना मारहाणीच्या दोन दिवसातील तीन घटना समोर आल्या होत्या. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करुन आणि ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. 34 वर्षीय रामा कुंडलिक शिंदे असे या व्यक्तीचे नाव होतं. त्याबरोबरच पुण्यातील धानोरीत भर रस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. चार-पाच जणांमध्ये गाडी काढण्यावरुन पोलिसांशी वाद होता. वाद शिगेला पोहचल्यानंतर हाणामारी झाल्याची घटना घडली होती. या मारहाणीत पोलीस कर्मचारी यांना गंभीर दुखापत झाली होती. 


धाक नेमका कुणाचा?
मागील काही महिन्यापासून राज्यभरात पोलिसांच्या मारहाणीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांना असं मारहाण करत, कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का? किंवा तरुणांना धाक नेमका कुणाचा असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.