Chandrakant Patil : लोकशाहीत मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, अशी इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यासाठी शिवसेना आणि कॉंग्रेसला सोबत घ्यावे लागणार आहे. मात्र 2024 पर्यंत तीन पक्ष सोबत राहतील का?, असा प्रश्न मंत्री चंद्रकांत पाटील त्यांनी उपस्थित केला. ते पुण्यात बोलत होते.
अडीच वर्ष मविआ सरकार असताना ओला दुष्काळ जाहीर केला नाही, याची आठवण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना असायला हवी, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. महात्मा गांधी देश फिरले, सर्वसामान्यांमध्ये वावरले त्यामुळे त्यांच्यासारखे नेते भारताला मिळाले, हे उद्धव ठाकरे आणि माजी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना फार उशिरा कळलं. मातोश्रीवर राहून राज्यातील लोकांचे दुख: कळतात, असं त्यांना वाटत होतं. मात्र आता प्रत्यक्ष दौरे करत असताना त्यांना अनेक गोष्टींचा सक्षात्कार झाला. ही चांगलीच बाब आहे, असंही ते म्हणाले.
'विरोधकांच्या योग्य मागणीचा विचार करु'
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका करायलाच पाहिजे. त्यांनी टीका केली नाही तर लोकांना ते विरोधक आहेत हे कळणार नाही. विरोधी पक्षांच्या टीकेची दखल सत्ताधाऱ्यांनी घ्यायला हवी मात्र ते सत्ताधारी असताना त्यांनी अनेक गोष्टी केल्या नाहीत. विरोधकांनी योग्य मागण्या केल्या तर त्यावर नक्की विचार करु, असा विश्वास देखील त्यांनी दिला आहे.
तर ते रस्त्यावर उतरले असते: चंद्रकांत पाटील
दिवाळीच्या आनंदाची शिधा अनेकांपर्यंत पोहोचली नाही. अनेकांना किट मिळालेच नाही यासाठी विरोधक आंदोलनं करत आहेत. मात्र जर खरंच कीट मिळाले नसते तर या लोकांनी आंदोलनच नाही तर ते रस्त्यावर उतरले असते, असंही ते म्हणाले.
'गरजेनुसार प्राध्यापकांची भरती करु'
प्राध्यापकांंना आंदोलन करण्याचं काहीही कारण नाही. अनेक वर्षांनी 2088 जागा भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. 2017 मध्ये सगळ्या प्रकारची आकडेवारी पाहता 8000 प्राध्यापकांची गरज होती. त्यामुळे 2088 प्राध्यपक भरतीला परवानगी दिली आणि त्यांची भरती देखील सुरु आहे. भरती करताना महाविद्यालयाचा किंवा शिक्षण संस्थेचा रोस्टरची पडताळणी करावी लागते. अनेक संस्थांनी आपल्या जवळच्या लोकांची भरती केली आहे त्यावेळी जातीचं आरक्षण बाजूला ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे जातीचं आरक्षण चेक करुनच पडताळणी करावी. ज्या संस्था नीट सुरु आहे त्यांना अनेक गोष्टींच्या परवानग्या मिळत आहे. त्यांनी प्रक्रिया सुरु झाली आहे. यानंतर सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा आढावा घेऊन पुढच्या भरतीसाठी परवानगी मागू, त्यामुळे आंदोनल करु नये, अशी विनंती त्यांनी प्राध्यापकांना दिली आहे.