पुणे : जेवणाच्या टेबलावरुन झालेल्या वादातून विवाह समारंभात नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर (CRIME) कट्यारने वार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे लग्नाच्या दिवशीच नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल कार्यालयाचे मालक करण सणस यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अभिजीत मिरगणे, राहुल सरोदे यासह इतर 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणस यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन भागात श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. हा सगळा प्रकार 6 जानेवारी रोजी रात्री 8 : 30 वाजताच्या दरम्यान याच ठिकाणी घडला. या ठिकाणी आरोपी नवरदेव अभिजीत याचा विवाह संपन्न झाला होता.
विवाह समारंभानंतर अभिजीत आणि नातेवाईक स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून इतर काही जणांना ये-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकावण्यास सांगितले. या कारणावरून अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. सणस यांना शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर अभिजीतने त्याच्याकडे असणाऱ्या कट्यारने वार केला. कट्यारीला धार नसल्याने फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली नाही. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यात गुन्हेगारीत वाढ
पुण्यामध्ये काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झालेली बघायला मिळत आहेत. अशताच काही दिवसांपूर्वी पुण्यात चक्क मटणाची (Mutton) उधारी न देता दुकान मालकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. विशेष म्हणजे, ही उधारी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 61 लाखांची उधारी होती. धक्कादायक म्हणजे पुण्यातील (Pune) एका प्रसिद्ध हॉटेल मालकानेच ही फसवणूक केल्याचं देखील समोर आलं होतं. हॉटेलसाठी मटन, चाप खिमा असे मटणाचे अनेक प्रकार घेतल्यावर त्याचे पैसे दिले नसल्याने मटन विक्रेत्याने हा गुन्हा दाखल केला होता. फजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांवर हा गुन्हा दाखल झाला. ते पुण्यातील प्रसिद्ध बागबान हॉटेलचे मालक आहेत.
अफजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांवर पुण्यातील लष्कर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील 35 वर्षे पीडित फिर्यादी यांचे पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या शिवाजी मार्केट या ठिकाणी मटणाचे दुकान आहे.
इतर महत्वाची बातमी-