पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील अनाथालयातून (Rajiv Gandhi Zoological Park Katraj) बिबट्या (Leopard) पळून गेल्याचे उघडकीस आले . मागील 24 तासापासून या बिबट्याचा शोध सुरू आहे. या दरम्यानच प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर आणखी एक प्रकार उघडकीस आला. पोलीस नसतानाही (Crime News) चारचाकी वाहनावर पोलीस असल्याची (Fake Police) नेमप्लेट लावून फिरणाऱ्या एका तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या तोतयाकडे विचारपूस करत असताना त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर मात्र या पोलीस कर्मचाऱ्याने या तोतयाची चांगलीच धुलाई केली आणि शेवटी ताब्यात घेतले. हा संपूर्ण प्रकार मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्राणी संग्रहालयातील अनाथालयातून बिबट्या पसार झाल्याने त्याचा शोध सुरू होता. संग्रहालयाचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे जवान या बिबट्याचा शोध घेत होते. याच दरम्यान एक चारचाकी वाहन प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर आले. त्याच्यावर पोलीस असे लिहिले होते. आतील चालकाने आपण पोलीस असून आतमध्ये जाऊ द्या असे सांगितले. दरम्यान प्रवेशद्वारावर असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याचा संशय आला. त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्याचे बिंग फुटले. तरीही त्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी केली. इतकच नाही तर धक्काबुक्की केली. त्यानंतर मात्र संतापलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या तोतयाची चांगलीच धुलाई केली आणि शेवटी त्याला ताब्यात घेण्यात आले.
कात्रज परिसरात भीतीचं वातावरण
राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज परिसरात आहे. हा बिबट्या पळाल्याने या परिसरांत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक नागरिकांकडून बिबटा कुठे गेला?, असे प्रश्न विचारले जात आहे. शिवाय राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारात नागरिकांनी गर्दीदेखील केली आहे. मात्र या आवारात गर्दी करु नये, असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे. साधारण बिबटा नेमका कोणत्या परिसरात आहे, याचा शोध लागत नाही आहे. त्यामुळे हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं असलं तरीही सर्व रेस्क्यू टीमकडून प्रयत्न केले जात आहे.
इतर महत्वाची बातमी-