पुणे: पुणे शहरातील एका गजबजलेल्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध आपली बीएमडब्ल्यू कार उभी करून तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, फुटपाथवरती लघुशंका केल्याची घटना समोर आली, त्यानंतर एका व्यक्तीने त्या तरूणाला जाब विचारला तेव्हा त्या तरूणाने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. ही संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू आहे. या घटनेबाबत पुण्याचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. 


आज सकाळी 7:30 शास्त्रीनगर मध्ये जी घटना घडली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकर आरोपीला ताब्यात घेणार आहोत. काही इनपुट आम्हाला मिळाली आहेत. त्याच्यावर आधी एक गुन्हा दाखल आहे, त्या संदर्भात माहिती नाही, गरज लागली कुटूंबातील लोकांना चौकशीला बोलवणार आहे, त्याचबरोबर विनयभंगाच्या गुन्ह्यासंदर्भात महिलांच्या कोणाच्या अद्याप तक्रारी आल्या नाहीत, तक्रारी आल्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती देखील पुण्याचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे. 


वडिलांनी काय दिली प्रतिक्रिया


गौरवच्या वडिलांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हणाले, "गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते. गौरवने सिग्नलवर नाहीतर माझ्या तोंडावर लघूशंका केली आहे. गौरवचा मोबाइलच सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी कारवाई होईल, ती मला मान्य आहे," अशी प्रतिक्रिया तरूणाच्या वडिलांनी एका मराठी वृत्तावाहिनीशी संवाद साधताना दिली आहे. गौरव अहुजा आणि त्याच्या मित्रावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गौरव अहुजा फरार, पोलिसांचा शोध सुरू


ही घटना व्हायरल झाल्यानंतर गौरव अहुजा सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या वडिलांच्या नावावर ही कार नोंदणीकृत आहे. या घटनेनंतर गौरवच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.