पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये तरूणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज नावाच्या लॉजमध्ये हा प्रकार घडला आहे. नितेश नरेश मिनेकर असं आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितेश मिनेकर हा आपल्या प्रेयसी सोबत लॉजमध्ये जात असतानाची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळाने नितेश मिरेकर याने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. संबधित घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन!
कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना समोर आली आहे, यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान कारने MH12 NE 4464 पहिल्यांदा एक्टिवावरील तिघांना धडक दिली.या घटनेमध्ये ते तिघे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पुढे एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने चालक रौफ अकबर शेख गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना नोबल हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक दारुच्या नशेत असल्याची प्रथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघात झाल्यावर चालक भरधाव वेगात कार घेऊन पळून गेला. या अपघातात रौफ अकबर शेख या दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला आहे. या आलिशान कारच्या चालकाने २ दुचाकींना धडक दिली यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.