मुंबई : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) (Mhada) पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते 'गो -लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. म्हाडा पुणे मंडळाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे, कार्यकारी अभियंता प्रकाश वाबळे, मनीषा मोरे, उपमुख्य अधिकारी मोहन बोबडे आदी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी म्हाडाने मुंबईत 2030 घरांची सोडत काढली होती. त्या सोडतीची लॉटरीही नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आता, पुणे विभागांतर्गत सोडत काढण्यात आली आहे. त्यामुळे, पुण्यात घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना ही नामी संधी आहे.
याप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले की, सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळण्यासाठी म्हाडा एकमेव, विश्वासार्ह पर्याय आहे. म्हाडाच्या अद्ययावत संगणकीय प्रणालीमुळे कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अर्ज सादर करणे ते सदनिकेचा ताबा मिळण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. भविष्यात म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आळंदी, शिरूर येथे जागा उपलब्ध झाली असून लवकरच येथे गृहनिर्माण योजना राबविली जाणार आहे. पुण्यातील म्हाडाच्या जुन्या वसाहतींच्या पुनर्विकास योजनेच्या माध्यमातूनही परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुणे मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत 5 डिसेंबर, 2024 रोजी काढण्यात येणार आहे. 10 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात होणार असून नोंदणीकृत अर्जदार 10 ऑक्टोबर, 2024 रोजी 12 वाजेपासूनच ऑनलाइन अनामत रक्कम भरू शकणार आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात येणार आहे. 12 नोव्हेंबर,2024 रोजी रात्री 11.59 पर्यन्त अर्जदार ऑनलाइन अनामत रक्कमेचा भरणा करू शकणार आहेत. 13 नोव्हेंबर, 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी दिनांक 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत. 30 नोव्हेंबर, 2024 रोजी सोडतीत सहभाग घेणाऱ्या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य
पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2340 सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 93 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील 418 सदनिका प्रथम येणार्या स प्रथम प्राधान्य तत्वावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3312 सदनिकांचा समावेश आहे तसेच 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 131 सदनिकांचा समावेश आहे.
नोंदणीपूर्वी संकेतस्थळाला भेट द्या
मंडळातर्फे इच्छुक अर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे की, अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे. ही पुस्तिका https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही.