पुणे : पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचं नाव (Pune Crime news) घेत नाही आहे. त्यात भाईगिरीचे प्रकारही वाढले आहे. कधी कोणी कोणाचा पडशा पाडताना दिसत आहे तर कधी कोणी कोणावर थेट गोळीबार करताना दिसत आहे. यात क्षृल्लक कारणावरुन झालेल्या वादांचं प्रमाण जास्त आहे. त्यातच आता भाईगिरीच्या वादातून कानाचा लचका तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
तीन मित्र पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या मार्केट यार्ड रोडवर गप्पा करत होते. यावेली एका मित्राने मी मोठा भाई असल्याचं सांगितलं यावरु दुसऱ्या मित्राला राग आला आणि त्याने तू खूप मोठा भाई झालास का? असा प्रश्न विचारला. हे सगळं सुरु असताना दुसऱ्या मित्राचा राग अनावर झाला आणि त्याने थेट हल्ला करत कानाचा लचका तोडला, डोक्याला दगडाने मारहाण केली आणि हा मित्र एवढ्यावरच न थांबता दारूची फुटलेली बाटली घेऊन मारण्यासाठी फिर्यादीचा पाठलाग केला. यावेळी जखमी झालेला मित्राने परिसरातून पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला. याप्रकरणी हर्ष कैलास कांबळेवय 20 यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सौरभ नितीन आदमाने (वय 24) आणि पवन काळे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात रोज नवे भाई अन् टोळ्या
पुण्यात मागील सहा महिन्यांपासून कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. त्यांचा हा धुमाकूळ कमी करण्याससाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहे. मात्र सध्या बघायला गेलं तर पुण्यात रोज नवी एक टोळी तयार होताना दिसत आहे आणि रोज नवा भाई तयार होताना दिसत आहे. भररस्त्यात मारहाण करणं, गाड्या फोडून दहशत निर्माण करणं, एकमेकांवर क्षृल्लक कारणावरुन हल्ले करणं हे प्रकार सुरुच आहे. भाईगिरीच्या नावाने पुण्यात अनेक परिसरात धुमाकूळ माजवला जात असल्याचं घडत असलेल्या घटनांमधून दिसत आहे.
विशीतील तरुण गुन्हेगारीत
पुण्यातील गुन्हेगारीतील आरोपींचं वय बघितलं तर विशीतील तरुण आरोपी असल्याचं दिसून येत आहे. कॉलेजमध्ये दादागिरीपासून सुरु झालेली गुन्हेगारी मोठ्या टोळ्यांपर्यंत येऊन पोहचतो. त्यामुळे या तरुणांना योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांना गुन्हेगारीपासून लांब ठेवणं हे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-