Pune Crime : भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या नावाने एका व्यावसायिकाकडे (Builder) तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. संदीप पाटील आणि शेखर ताकवणे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये द्या असं म्हणत या दोघांनी एका बिल्डरकडे खंडणी मागितली होती.
भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी पैसे देण्याची आरोपींची बिल्डरकडे मागणी
पुण्यातील (Pune) नामांकित व्यावसायिकाने या संदर्भात पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांची ओळख एका मंदिरात झाली होती. संदीपने शेखरला पैसे कमावण्यासाठी अमिष दाखवलं आणि त्या दोघांनी हा प्लॅन आखला. संदीप पाटीलने त्याच्या मोबाईलवर "कॉल मी" नावाचे एक ॲप डाऊनलोड करुन त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲपद्वारे त्यांनी व्यावसायिकाला मोहोळ बोलतोय असे भासवले आणि त्यांना भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी हे पैसे लागणार आहेत असं सांगितलं.
कसा आखला खंडणीचा प्लॅन?
आता नेमकं मुरलीधर मोहोळ आणि या बिल्डरचा नंबर या आरोपींना कुठून मिळाला असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर त्याचे उत्तर एकदम सोपे आहे 'इंटरनेट'. या प्रकरणात आरोपींनी गुगलवरुन कोथरुडमधील टॉप बिल्डर असे सर्च करुन फिर्यादीचा नंबर शोधला आणि 'कॉल मी' नावाच्या ॲप वापरुन त्यांना मुरलीधर मोहोळ बोलतोय असं भासवले. तीन कोटी रुपये द्या अन्यथा तुमच्या नावाची बदनामी करु असं सांगितलं. हा सगळा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी या दोघांना पकडण्यासाठी सापळा रचला आणि अगदी सिनेस्टाईल ताब्यात घेतलं.
घडलेला प्रकार धक्कादायक : मुरलीधर मोहोळ
दरम्यान घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः खुलासा केला असून यातील कुठल्याच व्यक्तीला आपण ओळखत नसून झालेला प्रकार धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं.
या घटनेवरुन सर्वसामान्यांनी एक धडा नक्की घ्यायला हवा की एखाद्याने मोबाईल फोनवरुन पैशांची मागणी केली तर आलेला फोन नक्की ओळखीच्या व्यक्तीने केला आहे का हे तपासा अन्यथा तुम्ही देखील या स्पूफिंगच्या जाळ्यात अडकाल.
VIDEO : Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली 3 कोटींची खंडणी