Pune Crime News : न्यूझीलंडमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत (Pune Crime) उच्चशिक्षित व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मल्टी नॅशनल कंपनीमध्ये वरिष्ठ पद मिळवून देतो, असे सांगत 58 वर्षीय व्यक्तीची तब्बल 7 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी 58 वर्षीय व्यक्ती यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र, रिचर्ड अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 


या तिघांनी मेलवरुन केला संपर्क


तिघांनी या उच्चशिक्षित व्यक्तीसोबत मेल आयडीवरुन संपर्क केला होता. या मेलवरुन त्यांच्यात संभाषण झालं होतं. त्यामुळे या तिघांची नेमकी नावं कोणती यासंदर्भात अद्याप कोणतीही खात्री नाही आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार मार्च 2022 ते एप्रिल 2022मध्ये घडला. ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र आणि रिचर्ड यांनी तक्रारदाराला बेयर कॉर्पसायन्स व मिनिस्ट्री ऑफ बिझिनेस, इनोवेशन अँड एम्प्लॉयमेंट, न्यूझीलंड या कंपनीचे कर्मचारी असल्याचं सांगितलं. या कंपनीमध्ये वरिष्ठ पदासाठी नोकरी लावून देतो, असे त्यांना ई-मेल केले. इतकंच नाही तर कंपनीचे बनावट कागदपत्र, लेटर, व्हिजा देखील ईमेल केले होते. त्यांच्या या आमिषाला हे उच्चशिक्षित बळी पडले. 


सात लाख रुपयाची फसवणूक 


या तिघांनी तक्रारदाराला इमिग्रेशनसाठी पैसे लागतील, असे सांगत बँक खात्याचा नंबर देऊन त्यात 7 लाख रुपये पाठवायला सांगितले. विश्वास संपादन झाल्यानंतर वरिष्ठ पदावर नोकरी मिळेल असंही सांगण्यात आलं होतं. या अमिषाला बळी पडून तक्रारदाराने पैसे ट्रान्स्फर केले. त्यानंतर तक्रारदाराने या तिघांशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांशीही कोणताही संपर्क होऊ शकला नाही, त्यानंतर अशा प्रकारची फसवणूक झाल्याचं तक्रारदाराच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांना हा घडलेला प्रकार सांगितला. या सगळ्या प्रकरणाला पोलीस तपास करत आहेत. 


आमिषाला बळी पडू नका


सध्या सगळीकडे ऑनलाईन प्रक्रिया केली जाते. अनेक अॅपवरुन नोकरी मिळेल, अशा जाहिराती केल्या जातात. त्यासोबतच अनेक वेबसाईट्स आणि क्लासेस नोकरी देण्याचं आश्वासन देतात. त्यामुळे नागरिकांनी या पडताळणी केल्याशिवाय कोणत्याच आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यासोबतच कोणतीही खात्री केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करु नका, असंही त्यांनी सांगितलं आहे. सध्या असे अनेक प्रकार वाढत त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.