Bhushan Singh Raje Holkar : वाफगावचा किल्ला ( Vafgaon Fort) हा अनेक  ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. त्यामुळं हा किल्ला लवकरच संवर्धित करू असे वक्तव्य होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर (Bhushan Singh Raje Holkar) यांनी केलं. ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला वाफगावचा किल्ला आजही दुर्लक्षित उपेक्षित आहे. त्याचे जतन संवर्धन व्हावं यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असेही होळकर म्हणाले.  सर्वांनी एकत्र आल्यास परिसराचा विकास होईल. ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, पर्यटन वाढेल असेही होळकर म्हणाले.


किल्ला जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं


महाराजा यशवंतराव होळकर या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तु पावन झाली आहे. वाफगावचा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असल्याचे भूषणसिंहराजे होळकर म्हणाले. त्याचे जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही ते म्हणाले. भूषणसिंहराजे होळकर यांच्या नेतृत्त्वात 'होळकर राजपरिवारा' तर्फे राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते.


महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास प्रेरणादायी


राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. जगभरात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजं लढवय्या मनात पेरली. राजस्थान, माळवा, पंजाब, दिल्ली इतक्या भल्या मोठ्या प्रदेशात महाराजांनी इंग्रजांविरुद्ध युद्धे लढली. भारतमातेच्या रक्षणासाठी आपसातील मतभेद विसरुन देशभरातील सर्व राजा महाराजांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. इंग्रज यशवंतराव महाराजांना भारताचा नेपोलिअन म्हणत. महाराजांशी बिनशर्त संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना  स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता. हा इतिहास तरुणांना प्रेरणादायी असल्याचे भूषणसिंहराजे होळकर म्हणाले.  


सहा जानेवारीला राज्याभिषेक दिन सोहळा संपन्न


सहा जानेवारीला किल्ले वाफगाव इथे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला. गजी नृत्य, मर्दानी खेळ, शस्त्र अस्त्र प्रदर्शन, ढोल वादन आणि भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षी कर्तृत्ववान स्त्रियांना राज्याभिषेकाची संधी देण्यात आली होती. खेडच्या तेहसीलदार वैशाली वाघमारे, IAS स्नेहल धायगुडे, उज्वलाताई हाक्के, पूजाताई मोरे, ललिताताई पुजारी, संगीताताई पाटील यांनी महाराजांच्या मूर्तीवर राज्याभिषेक केला. या कार्यक्रमासाठी यशवंतराव महाराजांवर आणि होळकर घराण्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसह अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, अठरा पगड जातीतील विविध संघटना, इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने राज्य आणि देशभरातून उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Encroachment On Vishalgad : विशाळगडावरील अतिक्रमणावर सर्जिकल स्ट्राईक; शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला मोकळा श्वास घेणार