पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतानाच दिसत (PUNE CRIME) आहे. त्यात रोज नव्या घटना समोर येत आहे. कधी कोयता घेऊन दहशत माजवली जात आहे. तर कधी तेट रस्त्यांवर हत्या केली जात आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून रस्त्यावर गाड्यांची तोडफोडदेखील सुरु आहे. त्यातचपुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
येरवडा परिसरात दहशत माजवण्यासाठी नागरिकांना धमकवत दोन जणाकडून वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसंकडून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. अजय चित्रगुप्त बागरी,सुमीत भारत सितापराव असं अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. मध्यरात्री येरवडा भागात ही घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी येरवडा भागात 5 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार पुण्यातील येरवडा भागात 5 जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. या संदर्भात 40 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवर त्वरित अॅक्शन घेत हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी आणि या प्रकरणातील आरोपी एकमेकांना ओळखत असून फिर्यादी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या वाहनांची कोयत्यांनी तसेच दगडांनी तोडफोड करून नुकसान केले. तसेच परिसरात आरडाओरडा करून जमलेल्या लोकांना "तुम्ही याठिकाणी थांबू नका, नाही तर तुम्हाला देखील सोडणार नाही" अशी धमकी देवून हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली होती.
प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची नजर
पुण्यातील गुन्हेगारी वाढत चालली असून ती थांबवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता कंबर कसली आहे. सगळ्या अट्टल गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर, अशा लहान मोठ्या टोळ्यांवरदेखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यांना आधीच आदेश काढून कारवाई करण्याय येणार असल्याची तंबी दिली आहे. त्यासोबतच पोलिसांनी आता सगळ्या गुन्हेगारांची प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची डिजीटल नजर देखील असणार आहे.
इतर महत्वाची बातमी