मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरु शकणाऱ्या शिरुर मतदारसंघातील (Shirur Lok sabha Election) उमेदवार ठरवण्यासाठी सध्या महायुतीच्या गोटात सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, ही सगळी प्रक्रिया सुरु असताना वर्षा बंगल्यावर घडलेला एक प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. शिरुर लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर एक बैठक पार पडली. या मतदारसंघातून इच्छुक उमेदवार असलेल्या आढळराव पाटलांना बाहेर ताटकळत ठेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बंद दाराआड चर्चा झाली. 


सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil)  हे शिरुरमधून निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. परंतु, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही शिरुर मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिरुर कोणाच्या वाट्याला येणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.


वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?


शिरुर लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी वर्षा बंगल्यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जुन्नर तालुक्यातील नेतेमंडळी उपस्थित होती. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आणि इतर मतदार संघातील नेतेमंडळी देखील उपस्थित होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील आणि इतर नेत्यांना बाहेर ठेवून बंद दाराआड दिलीप वळसे-पाटील आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली. या प्रकारानंतर शिवाजीराव आढळराव पाटील वर्षा बंगल्यावरुन आपल्या सहकाऱ्यांसह बाहेर पडले. घडलेल्या प्रकारामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.


शिरुर मतदारसंघावर या आधीच अजित पवारांनी दावा केला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे खासदार असून ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील. तर अजित पवार गटाकडून अद्याप उमेदवार ठरला नाही. याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून आढळराव पाटील इच्छुक आहेत. 


म्हाडाचे अध्यक्षपद देऊन आढळरावांचा पत्ता कट


शिरूर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे राखण्यासाठी महायुतीने चंग बांधला आहे. त्यामुळेच या मतदारसंघावर दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या आढळरावांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन शांत बसवण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे म्हाडाचे अध्यक्षपदे हे राज्यमंत्र्यांच्या दर्जाचे आहे. त्यामुळेच आढळरावांचा पत्ता कट केल्याचीही चर्चा सुरू आहे. 


म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर मात्र शिरूर मतदारसंघावर दावा करणाऱ्या आढळरावांची भाषा काहीशी नरमाईची झाल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याच्या मागे आपण ठाम राहू, त्याचा प्रचार करू अशी भूमिका आढळरावांनी घेतली आहे.


असं असलं तरीही आढळरावांनी अद्यापही आपल्या उमेदवारीची आशा सोडली नाही. कारण या मतदारसंघावर दावा केलेल्या अजित पवार कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 


अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार


राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटासोबत गेले.  त्यामुळे नाराज झालेल्या अजित पवारांनी त्यांना पाडण्याचा चंगच बांधलाय. अमोल कोल्हे यांच्यासाठी आपण गेल्या निवडणुकीमध्ये जीवाचं रान केलं, आता या निवडणुकीत त्यांना पाडणार म्हणजे पाडणार अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. 


अजित पवारांच्या या निश्चयाचा फायदा आता आढळरावांना मिळणार की आणखी कुणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. त्यामुळे आढळरावांनी अद्याप आपल्या उमेदवारीची आशा सोडली नसल्याचं दिसून येतंय. 


ही बातमी वाचा: