Pune News : पुणे : सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहून आपल्यापैकी प्रत्येकालाच पडेल. ससून ड्रग्ज प्रकरण, पुणे पोर्शे अपघात प्रकरण आणि यासोबतच इतरही काही प्रकरणांनी विद्येचं माहेरघर असलेलं पुणं पुरतं हादरून गेलं. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीनं येरवडा कारागृहातून पलायन केल्याची माहिती मिळत आहे. खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यानं पलायन केल्याचा प्रकार 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आला आहे. त्यामुळे नेमकं चाललंय काय? हा प्रश्न पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात पाहायला मिळतोय. 


पुण्यातील (Pune News) येरवडा कारागृहात (Yerawada Jail) जन्मठेपेची शिक्षा (Life Sentence) भोगत असलेल्या एका कैद्यानं पलायन केल्याचा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 19 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला. राजू पंढरीनाथ दुसाने (वय 43) असं पळून गेलेल्या कैद्याचं नाव असून हा कैदी मुळचा छत्रपती संभाजीनगरचा असून वैजापूरच्या महालगावचा आहे. तुरुंग पोलीस शिपाई अविनाश पवार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी याप्रकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू पंढरीनाथ दुसाने याला 2015 साली वारजे माळवाडी परिसरात झालेल्या एका खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. या खून प्रकरणात त्याला फेब्रुवारी 2021 मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. 2019 ऑगस्ट रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे येरवडा कारागृहातील कैद्यांची गिनती सुरू होती. यावेळी राजू दुसाने हा सापडला नाही. त्यानंतर संपूर्ण कारागृहात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेच नव्हता, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 


संपूर्ण कारागृहाचा कोपरान् कोपरा शोधला तरीदेखील कैदी सापडला नसल्यानं कैदी क्रमांक 1056 राजू पंढरीनाथ दुसानं हा शिक्षा भोगत असताना खुल्या कारागृहातून पळून गेल्याचे निदर्शनास आलं. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाय करत आहेत. पोलिसांकडून कैद्याचा कसून शोध सुरू आहे.