पुणे : पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आल्याने खळबळ उडालीय. असिफ दाढीवर अनेक गंभीर गुन्हे नोंद असून, शस्त्रास्त्रांसह त्याला पोलीसांनी त्याला अटकही केली होती. अजित पवारांची त्याने भेट का घेतली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar)  यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. 


कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची बातमी समोर येऊन काही तास उलटत नाही, तो आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यातील पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीने भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे. असिफ दाढीने गुरुवारी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. असिफ दाढीला राजकारणात येण्याचे वेध लागले असून, त्यासाठी एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी तो गेला होता. तृतिय पंथियांसाठी काम करणाऱ्या एक संस्थेसाठी तो काम करतो अशीही माहिती समोर येत आहे. 


आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ दाढीची गुन्हेगारी पार्श्वभूमी?


आसिफ शेख उर्फ दाढी वर पहिला गुन्हा 1988 साली दाखल झाला. पहिला गुन्हा हा मारहाणीचा होता. पण, मारहाण करत त्याने गुन्हेगारी विश्वात पहिलं पाऊल टाकलं होतं. अगदी 2021 पर्यंत त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झालेत. 1988 मध्ये मारहाण करणे,  1996 आणि 2004 साली संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे, 2007 मध्ये अपहरण करून हत्या केली, 2009 आणि 2011 साली शस्त्राचा वापर करणे, विनापरवाना शस्त्र बाळगून कट रचने आणि 2021 साली अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी देणे. अशा गुन्ह्याचा यात समावेश आहे. 2011 साली पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने असिफ दाढीला त्याच्या घरातून पिस्तुलासह अटक केली होती.


पार्थ पवार- गजा मारणे भेटीला चुकीचं म्हणणारे अजित पवारांचाच फोटो समोर आला...


पार्थ पवार आणि गजा मारणे यांच्या भेटीचा फोटो समोर आल्यावर, पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची जी भेट घेतली आहे ते अतिशय चुकीचे असल्याचं अजित पवार म्हणाले होते. पार्थ ज्या घरी गेला होता त्याठिकाणी गजा मारणे आला होता.  माझ्या सोबत देखील असाच प्रकार घडला होता,  मात्र मी आता या संदर्भात काळजी घेतो आणि पोलीसांना आधीच सांगून ठेवतो असे अजित पवार म्हणाले होते. मात्र, आता पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ दाढीसोबतचा त्यांच्याच फोटो समोर आल्याने यावर अजित पवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! पुण्यातील कुख्यात गुंड श्रीकांत शिंदेंच्या भेटीला, भेटीचा फोटोही आला समोर