पिंपरी : पुण्यात पेटत्या गाडीत होरपळून मृत्यू झालेल्या तीन मित्रांचा अंत्यविधी संपवून घरी परतणाऱ्या इसमावरही काळाने घाला घातला आहे. हृदयविकाराचा धक्का आल्याने संतोष थोरात यांचा मृत्यू झाला.

आंबेगावमध्ये राहणारे संतोष थोरात हे केमिस्ट होते. पुण्यात गाडी पेटल्याने होरपळून मृत्यू झालेल्या पार्थिवावर
अंत्यसंस्कार झाल्यानंतर आळे फाटा येथून ते निघाले. त्याचवेळी संतोष यांनी छातीत दुखत असल्याचं सांगितलं.

पुण्यात भररस्त्यात स्विफ्ट पेटली, तीन प्रवासी जळून खाक


त्यांना एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. पुढील उपचारांसाठी चाकणला नेलं जात असताना
नारायणगाव ते मंचर दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कसा झाला अपघात?

अहमदनगर-कल्याण रोडवर पेट घेतलेल्या कार मध्ये तीन मेडिकल स्टोअर्सच्या मालकांचा होरपळून मृत्यू झाला. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावालगत मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली.

पुण्याहून परतत असताना नरेश वाघ आणि दिलीप नवले हे प्रशांत चासकर यांच्या घराजवळ पोहचले. मात्र 100 मीटर अंतरावर काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांची स्विफ्ट कार रस्त्यालगतच्या कठड्याला धडकली. गाडीच्या काचा बंद, त्यात एसी सुरु. त्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि गाडीचं इंजिन बंद पडलं. परिणामी सेंटर लॉक ऑपरेट झालंच नाही. त्यामुळं तिघे गाडीतच जळून खाक झाले.

वाहनचोरीचे प्रमाण वाढू लागल्याने त्यावर तोडगा म्हणून ऑटो इंडस्ट्रीने सेंटर लॉकचा पर्याय शोधला. चोरट्यांनी लॉक तोडण्याचा प्रयत्न केल्यास हे सेंटर लॉक सायरन देतं आणि चोरटे तिथून पोबारा करतात. मात्र तुम्ही गाडीत असताना सेंटर लॉकचे सिस्टम ऑपरेट होणं बंद झाल्यास तुम्ही जीवाला मुकू शकता. तेव्हा असे आणखी जीव जाऊ नयेत यासाठी ऑटो इंडस्ट्रीने पर्याय शोधायला हवा.