पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू (Dengue), चिकुनगुनिया आणि उष्णतेमुळे होणारे आजार यांसारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजारांचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन महापालिकेनं केलं आहे. या आरोग्यविषयक समस्यांचा नीट सामना करण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना या रोगांशी संबंधित लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या आणि कोणत्याही प्रकारचा ताप अंगावर काढू नका, असं आवाहनही महापालिकेने नागरिकांना केलं आहे. 


ही काळजी नक्की घ्या 


- डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घरातील पाण्याचे भांडे आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ  करा.
- घरांमधील पाण्याची गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करा.
- घराभोवती साचलेले पाणी सोडणं टाळा.
- वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधक जाळी वापरा.
- वैयक्तिक स्वच्छतेचा सराव करा आणि परिसर स्वच्छ ठेवा.
- घरामध्ये आणि आजूबाजूला न वापरलेल्या किंवा अनावश्यक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्याची खात्री करा.
- वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणी आणि कीटकनाशक उपचार केलेल्या बेड नेटचा वापर केला जाऊ शकतो.


औद्योगिक क्षेत्र, बांधकाम स्थळे, कार्यालये, घरगुती आणि व्यावसायिक सोसायट्यांच्या विविध क्षेत्रात या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यावर महापालिका भर देत आहे. परिसरातील  घातक भागात किंवा पाणी साचत असलेल्या भागांची माहिती पालिकेपर्यंत पोहचवणं गरजेचं आहे आणि साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणंदेखील गरजेचं आहे. त्याचे पालन न केल्यास पालिका अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाई होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


या सगळ्या रोगांचा सामना करण्यासाठी डासांची प्रजनन होईल त्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी ठिकाणं तत्काळ नष्ट करण्यासह प्रतिबंधात्मक  योजना तयार करण्यात आली आहे. महापालिकेने रहिवासी आणि व्यावसायिक सोसायट्यांना उद्देशून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. कोणताही उद्रेक होऊ नये म्हणून रहिवाशांनी नियमित तपासणी करून आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करून अधिकाऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. 


शिवाय डेंग्यू चाचणी किट महानगरपालिकेचे दवाखाने आणि आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहेत. नागरिकांनी नियमित तपासणी आणि तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबतच पाण्याचे डबे स्वच्छ करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे, अत्यावश्यक आहे. आपल्या परिसरात डेंग्यू, चिकुनगुनिया आणि उष्णतेशी संबंधित आजारांच्या वाढत्या धोक्याची महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या ठिकाणांवर कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


इतर महत्वाची बातमी-


Health Tips : तुमच्या मुलांना डेंग्यूपासून दूर ठेवायचंय? 'या' टिप्स फॉलो करा; रोगापासून सुरक्षित ठेवा