Pune Bypoll Election : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती (Vanchit Bahujan Aghadi) झालेली असताना आता चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत (Pune Bypoll Election) वंचितच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच चिंचवडमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार नसल्यामुळे वंचित वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यातच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये बुधवारी (15 फेब्रुवारी) पार पडलेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचं समजतं. मात्र या बैठकीनंतरही वंचित राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना पाठिंबा देण्यावर ठाम असल्याचं बोललं जातं आहे. 


काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अद्याप पाठिंबा मागितलेला नसल्यामुळे, वंचित बहुजन आघाडी आज (16 फेब्रुवारी) निर्णय जाहीर करण्याचीही शक्यता आहे. दरम्यान 2019  साली वंचित बहुजन आघाडीने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता आणि प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) तेव्हा तीन सभाही घेतल्या होत्या. त्यामुळे, या खेपेला वंचित बहुजन आघाडी राहुल कलाटेंना पाठिंबा देऊ शकते, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र कसबा मतदारसंघाबाबत अद्याप वंचितने कोणताही निर्णय घेतला नाही, अशी माहिती समोर आली आहे.  


मनसेचा भाजपला पाठिंबा


तर दुसरीकडे कसबा (Kasaba By Poll Election) आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad By Poll Election) मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दिवसांत मनसेची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात मनसे आणि भाजप, शिंदे गटाशी युती होणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीत मनसेने (MNS) भाजपला (BJP) दिलेला पाठिंबा हे त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता, मनसेने आपली भूमिका बदलली असून, ते आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर समोर येत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांचं वावडं नसल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.


राहुल कलाटेंमुळे निवडणूक चुरशीची


महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्याने राहुल कलाटे (Rahul Kalate)  यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केल्यानंतरही राहुल कलाटे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. ते चिंचवडमध्ये आता शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. 2019 च्या निवडणुकीत राहुल कलाटे यांना नाना काटे यांच्यापेक्षा जास्त मतं पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाला तर अधिक मतं पारड्यात मिळवता येईल, असा विचार महाविकास आघाडीकडून सुरु आहे.