Devashri Bhosale : सध्या सोशल मीडियाचं जग आहे. भारतातील अनेक लहान मुलं सोशल मीडियावर त्यांच्या कलेमुळे प्रसिद्ध आहे. या सगळ्या चिमुकल्यांना अनेक फॉलोवर्सदेखील (India Book Of record) आहे. सोशल मीडियावर लोकांना जे बघायला आवडतं तेच आपल्याल मुलांना शिकवून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर आपण पाहिले आहेत. मात्र परदेशात राहुन आपल्या (Pune) चिमुकलीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्याचं काम पुण्यातील भोसले दाम्पत्य करत आहे. पुण्यातील भोसले दाम्पत्याने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला पोवाडे, शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा शिकवल्या. वेदांशी भोसले (vedanshi Bhosale) असं या तीन वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. अवघ्या 3 वर्षांची ही चिमुकली परदेशात राहून मराठी मातीतील संस्कार न विसरता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खड्या आवाजात गाते. एवढंच नाही तर तिने शिवरायांच्या शौर्य कथा आणि पोवाड्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवला आहे.


वेदांशी ही मूळची पुण्यातील घोरपडे पेठेतील आहे. सध्या ती तिच्या आई-वडिलांबरोबर डेन्मार्क येथील ओडेन्स या शहरात राहते. ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमात 3 मिनिटे आणि 58 सेकंदात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्तुती पोवाडा तिने गायला आहे. सर्वात लहान वयात  पोवाडा गाणारी मुलगी म्हणून इंडिया बुकने तिची नोंद घेतली आहे. आई प्रीती भोसले ही गृहिणी आहे आणि वडील संतोष भोसले हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. वेदांशी ही 2 वर्षांची असल्यापासून मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हणते.




परदेशात वडीलधाऱ्या  मंडळींच्या अनुपस्थितीत तिला आपले भारतीय संस्कार कसे देता येतील, याचा सतत प्रयत्न आम्ही करीत असतो. भारत विविधेत एकता असलेला देश आहे. त्यामुळे भारताची संस्कृती जगात सर्वात वेगळी आणि उल्लेखनीय आहे. शिवाजी महाराज अनेकांना फक्त माहिती आहे मात्र त्यांच्या शौर्य कथा आपण आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजे. त्यांना लहान वयातच शिवाजी महाराजांची ओळख करुन दिली पाहिजे, असं वेदांशीचे वडिल संतोष भोसले सांगतात.


 






मी वेदांशीला दररोज मराठी भक्ती गीते, भावगीते, श्लोक, गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि कथा ऐकवत असे आणि तितकेच मन लावून वेदांशी या सगळ्या गोष्टी ऐकायची आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करायची. या गोष्टीचा परिणाम तिचे वय वाढत असताना खूप छान झाला आणि त्यामुळेच ती सगळे श्लोक, भावगीते व पोवडा आनंदाने म्हणते, असेही त्यांनी सांगितले, असं वेदांशीची आई सांगते.