Ajit Pawar on Police Reward : पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा, ही शक्कल लढवली आहे. या योजनेवर मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली आहे. पोलिसांना जर बक्षिसांचं (Pune Police) आमिष दाखवायला लागला तर कठीण होईल. त्यामुळे पोलिसांनी नवे पायंडे पाडू नये, अशी भूमिका अजित पवारांनी स्पष्ट केली आहे. 


अजित पवार म्हणाले की, एखादा गुंड (Koyta gang) अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा अशा प्रकारे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांनी नवे पायंडे पाडू नये. आरोपींना पकडणं पोलिसांचं काम आहे. कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवणं आणि सगळ्या गुन्ह्यांसंर्भात माहिती ठेवणंदेखील पोलिसांचं काम आहे, असंही ते म्हणाले. 


वीरप्पन, चार्ल्स शोभराज यांच्यावेळी असे रिवार्ड जाहीर करण्यात आले होते. यांच्यासारखे गुन्हेगार पकडण्यासाठी रिवार्ड जाहीर केलं तर ते समजू शकतो. मात्र सरसकट असं बक्षीस जाहीर करुन पोलिसांना गुन्हेगार पकडण्यासाठी बक्षिसांचं प्रलोभन योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या माध्यामातून माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. 


कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा; पुणे पोलिसांची नवी शक्कल चर्चेत


पुण्यात गुन्हेगारी रोखण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहे आणि शुल्लक कारणावरुन गोळीबार आणि हाणामारीची प्रकरणंदेखील सातत्यानं समोर येत आहेत. या वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मास्टर प्लॅन आखला आहे. त्यांनी कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा, ही योजना आखली आहे. या योजनेची सध्या शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. या योजनेवर अजित पवारांनीदेखील टीका केली आहे. 


योजना नेमकी काय आहे?

कोयता गॅंगच्या आणि बाकी गुन्हेगारांना पकडल्यास पोलिसांना रिवॉर्ड जाहीर केले आहेत. त्यात वेगवेगळ्या रकमेची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत. कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास 3 हजारांचं बक्षीस देण्यात येईल. पिस्तूलजवळ बाळगणारा आरोपी पकडून दिल्यास 10 हजार तर फरार आरोपी पकडून दिल्यास 10 हजारांचं बक्षीस देण्यात येईल. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.