Pune Auto Rickshaw Strike: पुण्यातील काही रिक्षा (Rickshaw) संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलनाची (Pune Rickshaw Bandh Protest) हाक देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील रिक्षा आज पुन्हा बंद असणार आहेत. दुचाकीवरील प्रवासी वाहतूकीला विरोध दर्शवत रिक्षा संघटनांनी आज रिक्षा बंद आंदोलन पुकारलं आहे. तसेच, आज 11 वाजता आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही रिक्षाचालकांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीही बेकायदा बाईक टॅक्सी (Bike Taxi) विरोधात पुण्यातील रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत बंद पुकारला होता. 


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे.  रिक्षा बंदमधे सहभागी असलेले रिक्षाचालक 11 वाजता आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करणार आहेत. 


बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात 'बघतोय रिक्षावाला संघटने'नं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी 28 नोव्हेंबर रोजी 'बघतोय रिक्षावाला संघटने'नं बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बेमुदत संप पुकारला होता. त्यावेळी प्रशासनातील अधिकारी आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या आश्वासनानंतर रिक्षा संघटनांनी हा संप स्थगित केला होता.


रिक्षाचालकांनो 12 डिसेंबरला आंदोलन करु नका; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन


रिक्षा संघटनांनी आंदोलनाची हाक देताच जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं. रिक्षाचालकांनो 12 डिसेंबरला आंदोलन करु नका, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं होतं.  राज्यात बेकायदेशिररित्या  आणि विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षाचालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन  करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी केले आहे.


बाईक टॅक्सी अॅपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या समितीच्या सूचना


रिक्षाचालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षाचालकांच्या न्याय मागण्यांबाबत विचार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गठित समितीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपायुक्त (सायबर शाखा), पोलीस उपायुक्त (वाहतूक), पोलीस उपायुक्त (गुन्हे) आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीनं 7 डिसेंबरला झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सी ॲपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rickshaw Strike : रिक्षाचालकांनो 12 डिसेंबरला आंदोलन करु नका; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन