पुणे : नव्याने चावी बनवून न घेता, चावीचे 100 रुपये वाचवण्यास गेलेल्या पुण्यातील (Pune) रिक्षा चालकाला अडीच लाखांचा फटका बसल्याची आश्चर्यकारक आणि दुर्दैवी घटना घडली. संबंधित रिक्षाचालकाने चपलेच्या स्टँडमध्ये घराची चावी ठेवली होती, याबाबत चोरला सुगावा लागला आणि त्याने थेट भर दुपारी रिक्षाचालकाच्या घरावर डल्ला मारला. घरातून बाहेर पडलं की चावी चपलेच्या स्टँडमध्ये ठेवायची, कधी कधी खिडकीत किंवा दारासमोरील एका विशिष्ट जागेत ठेवायची, त्यानतंर घरातील सदस्याला फोन करुन चावीचं ठिकाण सांगायचं. सर्वसामान्य कुटुंबातील ही रोजची कहाणी. मात्र, ही आयडिया एका रिक्षाचालकास चांगलीच महागात पडली आहे. चपलेत चावी ठेवणं पुण्यातील रिक्षाचालक असलेल्या बाबुराव शिंदे यांच्या आर्थिक नुकसानीचं आणि घरं लुटण्यास कारणीभूत ठरलंय. याप्रकरणी, पोलिसांत (Police) तक्रार दाखल झाल्यानंतर चोरट्याचा शोध सुरू आहे.
बाबुराव शिंदे हे पुण्यात रिक्षा चालवतात. धायरी परिसातील निसर्ग हाईट्समध्ये हे चार जणांचं कुटूंब राहतं. घरातील तिघे सकाळी 8 वाजताच घर सोडतात आणि मुलगा 11 वाजता घराला कुलूप लावून शाळेत जातो. मागील दीड ते दोन वर्ष हा शिंदे कुटुंबाचा दिनक्रम नित्यनियमाने सुरू होता. मात्र, २५ सप्टेंबरला मुलाने रोजसारखं कुलूप लावलं आणि शाळेत निघून गेला. मात्र, तेवढ्यात घरावर पाळत ठेवून असलेल्या चोराने अलगद चपलेच्या स्टँडमधून चावी घेतली. कुलूप उघडलं आणि 15 मिनिटांच्या आत साडेतीन तोळे सोन्यावर डल्ला मारला. संध्याकाळी शिंदे यांची पत्नी घरी आल्या आणि रोजच्याप्रमाणे कामाला लागल्या. त्यावेळी कपाटातील अंगठीची डब्बी उघडी पडलेली दिसली. त्यामुळे, त्यांनी बाकी कपाट बघितलं तर घरातील सोन गायब झाल्याचं लक्षात आलं.
घरात या सोन्याबाबत सगळ्यांना विचारलं मात्र कोणीही सकाळपासून कपाट उघडलं नसल्याचं समोर आलं. त्यानंतर कुटुंबीयांनी घराबाहेरील सीसीटीव्ही चेक केला आणि एका मुलाने हा प्रकार केल्याचं समोर आल्यावर शिंदे कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. 100 रुपये खर्च करून जर चार चाव्या तयार केल्या असत्या, तर पै-पै जमवून खरेदी केलेलं सोन वाचलं असत, अशी भावना यावेळी काहींनी व्यक्त केली. तसेच, शिंदे कुटुंबीयांच्या मनातही हाच विचार आला. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
पोलिसांकडून तपास सुरू
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यावर आम्ही सीसीटीव्ही चेक केले आहेत. त्यावरुन गुन्हा दाखल केलाय. आरोपीचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच, घराची चावी हरवल्यास चावी न बदलता कुलूप बदलायला हवे, असे आवाहनही पुणे पोलिसांनी केलंय.
हेही वाचा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा