पुणे: धर्मवीर २ हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटाचा उत्तरार्ध आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यामध्ये दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटामध्ये स्वतःची भूमिका सादर केली आहे, यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या बंडावरून आणि बाकी घटकांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी याबाबत आपल्या सोशल मिडियावर पोस्ट लिहून प्रवीण तरडेंवर हल्लाबोल केला होता, याबाबत बोलताना आज तरडेंनी उत्तर दिलं आहे.
अंधारेंच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना प्रवीण तरडे म्हणाले, सुषमा अंधारे यांनी कुठे तरी ऐकलं वाटतं, त्यांनी ट्वीट केलं आहे. पण यात कुठेही नाव घेतलं नाही. कोणाचही नाव यात नाही. त्यांनी चित्रपट पाहिला नाही वाटतं त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, असं वाटतं, मात्र, आम्ही काय राजकारणी लोक नाहीत आम्ही कलाकार आहोत. ज्यांनी हा चित्रपट पहिला आहे ते प्रश्नच उपस्थित करू शकत नाहीत. जे घडलं नाही ते दाखवलं असं कोण बोललं असं मला वाटत नाही, चित्रपटात कुणाचं नाव घेतलं नाही, अंधारे यांचा गैरसमज झाला आहे. विरोधकांनी चित्रपट पाहिला तर त्यांनाही आवडेल, अशी प्रतिक्रिया प्रवीण तरडे यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले तरडे?
आज माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, 'सुषमा ताईंनी बहुदा सिनेमा पाहिलेला नाही. त्यांनी कुणाकडून तरी हे ऐकलं असेल, सिनेमा पाहिल्यानंतर तो संवाद नीट ऐकला, तर त्यांना कळेल की त्या संपूर्ण सीनमध्ये कोणाचं नाव घेतलेलं नाही. मलाही आश्चर्य वाटलं की, सुषमा ताई असं का म्हणाल्या. पण त्यांचं जे काही काम आहे. त्या एका राजकीय पक्षाचं काम करतात. मी अजिबात कुठेही कोणाचं नाव घेतलेलं नाही. सिनेमा पाहा तो सीन काय आहे ते पाहा. सिनेमा पाहिल्यानंतर कोणाला कोणता प्रश्नच पडणार नाही, ज्यांनी सिनेमा पाहिला आहे, त्यांना कोणालाही प्रश्न पडलेला नाही. विरोधकांनी सिनेमा पाहिला तर, विराधकांना देखील सिनेमा आवडेल. कारण ती दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे.आम्ही सिनेमा बनवला आहे. त्यामुळे सिनेमा पाहिल्यानंतर कोणाला प्रश्न पडणार नाही', असं तरडे म्हणाले आहेत.
काय पोस्ट आहे सुषमा अंधारेंची?
शिवसेनेत माझा प्रवेश हा गद्दारी झाल्यानंतर म्हणजे 28 जुलै 22ला झाला.पण मतांसाठी निवडणुकिसाठी थुकरट युक्ती तरडेनी दाखवली आहे. @mieknathshinde सांगताहेत गद्दारीचा एक कारण सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या..!! प्रवीण तरडेजी कलेशी बेईमानी म्हणतात ती हीच का?, अशी पोस्ट अंधारे यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्सवरती लिहली आहे.
धर्मवीरच्या पहिल्या भागाच्या मोठ्या यशानंतर आता 'धर्मवीर २'ची देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना खूप आधीपासून लागलेली होती. 'धर्मवीर' सिनेमाच्या प्रदर्शनानंतर 2022 मध्ये राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी राज्यासह देशाने पाहिली. आता 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' हे ब्रीदवाक्य घेऊन 'धर्मवीर २' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आता निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या आरोप-प्रत्यारोपांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.