Pune Accident News : पुणे शहरात (Pune) अपघाताचं प्रमाण मागील काही महिन्यांपासून सातत्याने वाढत आहे. या अपघातात अनेकांचे जीवही जात आहेत. असाच एक विचित्र अपघात पुण्यातील (Pune Ahamadnagar Highway) नगर रस्त्यावर झाला आहे. नगर रस्त्यावर केसनंद (Kesnand Fata) परिसरात दोन मोटारींची समोरासमोर धडक झाली. यात मोटार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे आणि चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मयूर भाऊसाहेब बहिरट (वय 25, रा. केसनंद, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात योगेश केंजळे, सर्जेराव माने, किरण गावडे, अजय जाधव जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार उपचार सुरु आहेत. मोटारचालक मयूर बहिरट हा केसनंद-बकोरी रस्त्याने निघाला होता. त्या वेळी दुसऱ्या मोटारीतून चौघेजण नगरहून पुण्याकडे निघाले होते. भरधाव मोटारींची समोरासमोर धडक झाली. अपघातात मयूर याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच बहिरट कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काही दिवसांपूर्वी याच मार्गावरील अपघातात चार जणांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी असाच विचित्र अपघात याच मार्गावर झाला होता. पुणे-नगर महामार्गावरील कारेगावजवळ फलकेमळा येथे मोठा अपघात झाला होता. कंटेनर आणि कार यांची धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात कार गाडीतील चार जणांचा जागीच मृत्यू होता. अपघातातील मृत पावलेले चारही जण एकाच कुटुंबातील होते. या अपघातानंतर पोलिसांकडून आणि पुणे प्रशासनाकडून अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना राबवल्या, मात्र तरीही अपघाताचं सत्र संपत नाही.
अपघातांना ब्रेक कधी?
पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी भोर परिसरात एका बसने पेट घेतला होता. थोड्या प्रमाणात या आगीची चाहूल लागताच चालकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर बसमध्ये अचानक भडका उडाला होता. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सगळ्यांकडून चालकांचं कौतुक करण्यात येतं. मात्र अपघात कधी थांबतील आणि नागरिक सुरक्षित प्रवास कधी करु शकतील, असा प्रश्न अनुत्तरितच आहे.